शैक्षणिक क्षेत्रात देश महाराष्ट्राकडे आशावादाने पाहतोयमहाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर ; सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचा ११० वा वर्धापन दिन
पुणे : बदलत्या शैक्षणिक परिस्थितीत आज मोठ्या संक्रमण अवस्थेतून आपण जात आहोत. महाराष्ट्रात उच्च शिक्षणात विद्यार्थी संख्या ४५ लाख असून तब्बल ६ हजार महाविद्यालये आहेत. उत्तरप्रदेश नंतर महाराष्ट्रात ही संख्या अधिक आहे. देशात ८६ विद्यापीठे इतकी सर्वाधिक संख्या आपल्याकडे आहे. त्यामुळे या क्षेत्रात देश महाराष्ट्राकडे आशावादाने पहात आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या ११० व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन भाऊसाहेब चितळे सभागृह, शिक्षण प्रसारक मंडळीची नवी इमारत येथे करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. सदानंद फडके उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, शिक्षण प्रसारक मंडळीचे उपाध्यक्ष गजेंद्र पवार, नियामक मंडळाचे अध्यक्ष सुधीर काळकर, उपाध्यक्ष राधेश्याम अग्रवाल, सदस्य तुषार कुलकर्णी, पराग ठाकूर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी असलेल्या पुणे विभागीय आयुक्त शितल उगले आणि पुण्याचे मुख्य आयकर आयुक्त विवेक वाडेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
डॉ. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले, शिक्षणात गुणवत्ता आणण्यासाठी नॅक चे मूल्यांकन आपण सक्तीचे केले. त्यामुळे नॅक मूल्यांकन असलेली सर्वाधिक महाविद्यालये महाराष्ट्रात आहेत. आता जर गरजेनुसार कोर्सेस बदलले नाहीत, तर विद्यार्थी याकडे पाठ फिरवतील. त्यामुळे कमी कालावधीचे कोर्सेस आपण नव्याने आणणे गरजेचे आहे.
डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, स.प.महाविद्यालयाने मला घडविले आहे. मी शिक्षक म्हणून येथे रुजू झालो होतो. महाविद्यालयाची वाटचाल मी बघितलेली आहे. पुण्यात ३० विद्यापीठे आहेत. लवकरच नव्या विद्यापीठांची घोषणा होईल. शिक्षणात स. प. सारख्या स्वायत्त महाविद्यालयांनी बदल घडवून आणावा.
अॅड. सदानंद फडके म्हणाले, आज प्राचीन मुलभूत तत्वाचा विसर आपल्याला पडला आहे का? हा विचार करायला हवा. राष्ट्राला बलवान करायचे असेल तर संस्कारी पिढी तयार करावी लागेल. नवीन शिकण्याची इच्छा संपली की वार्धक्याला सुरुवात झाली हे समजावे. त्यामुळे आपण कायम शिकत रहायला हवे. मातृभाषेतून जिथे शिक्षण दिले जाते, अशा शाळांना सवलती द्यायला हव्या. मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था आज ओस पडत आहेत.
सुधीर काळकर म्हणाले, स.प.महाविद्यालय हे विश्वविद्यालय होवो, हे सोनोपंत दांडेकर यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. जगात कुठेही गेलो तरी नू.म.वि. आणि स.प. चे विद्यार्थी आहेत, त्यामुळे याला एका अर्थाने विश्वविद्यालय म्हणता येईल. विस्तार, गुणवत्ता, सज्जनशक्ती संपर्क, परिवर्तन, ट्रेंड सेटर ही पाच उद्दिष्टे समोर ठेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ऋग्वेदा इनामदार व मोक्षदा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य प्रा. विद्या अवचट यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी विशेष श्रम घेतले.
सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे महाविद्यालय : चंद्रकांत पाटील
स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक मान्यवरांचा परिसस्पर्श या वास्तूला झाला आहे. त्यामुळे सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे महाविद्यालय अशी स.प. महाविद्यालयाची ओळख आहे. सर्वत्र नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवर सध्या भर दिला जात असून स.प. महाविद्यालयात कौशल्याधिष्ठित ज्ञानावर भर दिला जात आहे. धोरणाचा आशय समजून महाविद्यालयात अभ्यासक्रम शिकावला जात आहे, अशा शब्दात महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्हिडिओच्या माध्यमातून संस्थेचे कौतुक केले.
- फोटो ओळ : शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या ११० व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन भाऊसाहेब चितळे सभागृह, शिक्षण प्रसारक मंडळीची नवी इमारत येथे करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी असलेल्या पुणे विभागीय आयुक्त शितल उगले आणि पुण्याचे मुख्य आयकर आयुक्त विवेक वाडेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
