दगडूशेठ’ गणपती मंदिरात अधिक मासा निमित्त ‘शुक्ल यजुर्वेद घन पारायण’
‘
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली आयोजन
पुणे : गणेश नामावली हवन, गणेश पुराण हवन यांसह सर्व मराठी महिन्यातील चतुर्थीव्रत कथा आणि धुंडीविनायक मास म्हणजेच अधिक मास कथा हवन ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात करण्यात आले. अधिक मास अर्थात धुंडीविनायक मासाच्या निमित्ताने मंदिरात ‘शुक्ल यजुर्वेद घन पारायण’ संपन्न झाले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे आयोजित ‘शुक्ल यजुर्वेद घन पारायण’ अंतर्गत विविध धार्मिक विधी मंदिरात पार पडले. वेदमूर्ती मिलिंद राहूरकर गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली दररोज सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायं. ७ दरम्यान मंदिरात पारायण व हवन करण्यात आले.
गाणपत्य संप्रदायामध्ये ज्योतिष शास्त्राशी संबंधित भगवान गणेशांचा अवतार म्हणजे श्री ढुंढिराज अवतार. महाराजा दिवोदास नामक राजाच्या उद्धारासाठी झालेला आणि भगवान श्री शंकरांच्या द्वारे पूजन संपन्न झालेला हा दिव्य अवतार. आजही काशी क्षेत्रामध्ये भगवान श्री विश्वनाथ यांच्या मंदिरासमोर त्यांनी पूजन केलेले भगवान ढुंढिराज विद्यमान आहेत. विश्वनाथाच्या दर्शनाच्या आरंभी त्यांच्या दर्शनाची, वंदनाची परंपरा आहे.
त्यांच्या उपासनेचे विशेष महत्व असल्याने या महिन्याला गाणपत्य संप्रदायात ढुंढिराज मास म्हणतात. या काळात श्री गणेश विग्रहाची पूजा, श्री गणेशाना दुर्वार्चन, गणेश ग्रंथाचे पारायण, गणेश मंत्र जप याला विशेष महत्व आहे. त्यामुळे मंदिरात ‘चतुर्वेद स्वाहाकार’ आणि त्यानंतर ‘शुक्ल यजुर्वेद घन पारायण’ आयोजित करण्यात आले होते.
- फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे अधिक मास अर्थात ढुंढिराज मासाच्या निमित्ताने ‘शुक्ल यजुर्वेद घन पारायण’ आयोजन मंदिरात करण्यात आले.
