-श्री महालक्ष्मी मंदिरात गो माता ५६ भोग अन्नकोट
सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात अधिक मासानिमित्त महिनाभर कार्यक्रम ; गाय वासरू यांचे पूजन
पुणे : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात गो माता ५६ भोग अन्नकोट करण्यात आला. यावेळी मंदिरात गाय आणि वासराचे पूजन देखील करण्यात आले. भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे पुरुषोत्तम मासामध्ये हे पूजन व अन्नकोट मंदिरात करण्यात आला.
गाईला लागणारा हिरवा चारा, कडबा, चना डाळ, गूळ असे ५६ प्रकारचे मिष्टान्न नैवेद्यात दाखविण्यात आले. याशिवाय लापशी, अनारसे, म्हैसूर पाक याचा देखील यामध्ये समावेश होता. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांसह विश्वस्त मंडळाने उपक्रमांचे संयोजन केले आहे. यावेळी विश्वस्त ऍड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, नारायण काबरा, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया, मुरली चौधरी यांसह पदाधिकारी व मंदिराचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सोमवार, दि. १५ जून पर्यंत दररोज सायंकाळी ५ नंतर मंदिरामध्ये उपक्रम होणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.डॉ. चारुदत्त आफळे यांचे कीर्तन यांसह दीप उत्सव असे विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. तरी देवी भक्तांनी मोठया संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
