June 7, 2026

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

0
IMG-20260605-WA0038
Spread the love

-स्कूल झोन, झेब्रा क्रॉसिंग, भित्तीचित्रे आणि जनजागृती उपक्रमांद्वारे सुरक्षित शाळा परिसर उभारण्याचा प्रस्ताव

पुणे : औंध-बोपोडी परिसरातील शाळांजवळील चौक अधिक सुरक्षित, सुबक आणि वाहतूक पूरक करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाकडे निवेदन सादर केले आहे. प्रभाग क्रमांक ८ड अंतर्गत गणेशखिंड रोड परिसरातील विविध शाळांजवळील चौकांचा वाहतूकदृष्ट्या विकास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मुख्य अभियंता, पथ विभाग यांना दिलेल्या निवेदनात निम्हण यांनी नमूद केले आहे की, केंद्रीय विद्यालय, डी.ए.व्ही पब्लिक स्कूल आणि स्पायसर स्कूल या नामांकित शैक्षणिक संस्था मुख्य वर्दळीच्या रस्त्यालगत कार्यरत आहेत. शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांसह पालकांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतुकीवर ताण निर्माण होतो. परिणामी विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना अनेकदा धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागतो.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत संबंधित चौकांमध्ये ‘स्कूल झोन’ दर्शविणारे फलक, झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर, दिशादर्शक चिन्हे आणि स्पष्ट रस्ता सुरक्षा मार्गदर्शन व्यवस्था उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय शाळा परिसरात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देणारी आणि त्यांचे लक्ष वेधून घेणारी आकर्षक व प्रबोधनात्मक भिंतीचित्रे (वॉल पेंटिंग) रंगविण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे.

तसेच विद्यार्थी, पालक आणि वाहनचालकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी माहितीपर फलक व बॅनर्स लावण्यात यावेत, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात विशेषतः नमूद करण्यात आले आहे की, या भिंतीचित्रांचा दर्जा उत्तम राहण्यासाठी तसेच मुलांवर त्याचा प्रभावी परिणाम होण्यासाठी हे काम फाईन आर्ट्स किंवा कमर्शियल आर्ट क्षेत्रातील उच्च शिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ व्यक्ती अथवा संस्थांमार्फत करून घेण्यात यावे.

याबाबत बोलताना नगरसेवक सनी विनायक निम्हण म्हणाले, “विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय आहे. औंध–बोपोडी परिसरातील हजारो विद्यार्थी दररोज या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे संबंधित चौकांचे नियोजनबद्ध, सुरक्षित आणि वाहतूक पूरक स्वरूपात आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे. पुणे महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी.”

दरम्यान, पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता राजेश बनकर यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत विषयाचा योग्य पाठपुरावा करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह वाहतुकीचे शिस्तबद्ध नियोजन आणि शाळा परिसर अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी