अधिक मासात भगवंताचे अधिष्ठान अंतरंगात स्थित करण्याचे कामडॉ.भावार्थ देखणे ; श्री महालक्ष्मी मंदिरात अधिक मासानिमित्त महिनाभर कार्यक्रम
पुणे : भारतीय संस्कृतीमध्ये अधिक मासाचे महत्व जास्त आहे. हा मास सर्वत्र आनंदाने आणि हर्षाने साजरा केला जातो. अध्यात्मिक, सांस्कृतिक प्रयोजन आणि भगवंताचे अधिष्ठान अंतरंगात स्थित करण्याचे काम यामाध्यमातून होते, असे मत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आळंदीचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी व्यक्त केले.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे अधिक मास निमित्त मंदिरात महिनाभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डॉ.देखणे यांची प्रवचन सेवा झाली. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल यांसह प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल व डॉ. तृप्ती अग्रवाल यांसह विश्वस्त मंडळाने उपक्रमांचे संयोजन केले आहे.
डॉ.भावार्थ देखणे म्हणाले, भगवंत उपासनेसाठी एक महिना अधिक देण्यात आला आहे. अधिकाधिक सेवा करता यावी, यासाठी हा महिना. चांगले विचार देखील कानावर पडावे, हे देखील त्यामागील एक प्रयोजन आहे. आपण कोणत्याही माध्यमातून सेवा करायला हवी. सगळ्या सेवा भगवंताला जातात. नामस्मरण आणि श्रवण सेवा महत्वाची आहे. यातील एका उदाहरण म्हणजे, ज्ञानेश्वरी हा श्रोतृ संवाद आहे. त्यातून ज्ञानेश्वरी घडत गेली. त्यामुळे श्रावण सेवा ही अधिक महत्वाची आहे.
सोमवार, दि. १५ जून पर्यंत दररोज सायंकाळी ५ नंतर मंदिरामध्ये उपक्रम होणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.डॉ.चारुदत्त आफळे यांचे कीर्तन यांसह श्री सूक्त हवन, सुवर्ण कमल रजत कमल अर्चना, सहस्त्र बेल पत्र अर्चना, तुळशी अर्चना, पुष्प अर्चना, दीप उत्सव असे धार्मिक कार्यक्रम होतील.
याशिवाय सामाजिक उपक्रमांमध्ये पुस्तक तुला, गो माता अन्नकोट, झुला उत्सव, धान्य तुला दान याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी देवी भक्तांनी मोठया संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
- फोटो ओळ : श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे अधिक मास निमित्त मंदिरात महिनाभर विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डॉ.भावार्थ देखणे यांची प्रवचन सेवा झाली.
