June 2, 2026

युजर्स चार्जेसला व्यापारी, ग्राहकांचा विरोध

0
sanvidhan_news_150x150
Spread the love

कृषी उत्पन्न बाजार समितीने अनियमित शेतीमाल, बिगर शेतीमाल आणि इतर काही वस्तूंवर एक टक्का युजर्स चार्जेस आकारण्याचा निर्णय घेतल्याने महागाईमध्ये आणखीन भर पडणार आहे. या एक टक्का अतिरिक्त शुल्कामुळे डाळी, साखर, खाद्यतेल, पीठे, रवा, मैदा यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढणार असून, त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आधीच महागाईचा भडका उडालेला असताना पुन्हा हा अतिरिक्त चार्ज लावून ग्राहकांवर आर्थिक संकट लादण्याचा प्रयत्न होत आहे. यासह हा निर्णय मार्केटयार्ड परिसरातील व्यापाऱ्यांसाठी मारक आहे. जीएसटी, सेस आणि आता युजर्स चार्जेसमुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले असून, हे असेच चालू राहिले, तर व्यापार बंद करावा लागेल, अशी भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. व्यापाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे. महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने उपाययोजना करायला हव्यात, मात्र, सरकार सर्वसामान्य माणसाच्या खिशाला कापण्याचे काम करीत आहे. महागाईने दोनवेळच्या खाण्याची अडचण होऊ लागली आहे, आम्ही जगावे की नाही, हा आमचा सरकारला सवाल आहे, अशी संतप्त भावना ग्राहकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी