व्यापार करताना सेवाभाव जपणे गरजेचेपद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर ; स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन तर्फे व्यापारी एकता दिनानिमित्त पुरस्कार प्रदान
पुणे : व्यापार करताना केवळ आर्थिक नफ्यावर लक्ष केंद्रित न करता समाजाप्रती सेवाभाव जपणे आवश्यक आहे. प्रत्येकाने भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणे आवश्यक असून गुणवत्ता, सचोटी व प्रामाणिकपणाच्या बळावर व्यापारात यश मिळते, असे सांगत समाजासाठी योगदान देण्याची भावना व्यापाऱ्यांनी जपावी, असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
स्टेशनरी, कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशनच्या वतीने व्यापारी एकता दिनानिमित्त एस. एम. जोशी सभागृहात वार्षिक पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ बँकिंग तज्ञ विद्याधर अनास्कर, अध्यक्ष संजय राठी, उपाध्यक्ष नितीन पंडित, सचिव किशोर चांडक, खजिनदार सुनील शिंगवी तसेच सूर्यकांत पाठक, अरविंद पटवर्धन, मदनसिंह राजपूत, राजेश गांधी, सुरेश नेरगावकर, सचिन जोशी, मोहन साखरिया, किशोर पिरगल, अनिल प्रभुने, मनीष परदेशी, किरण चौहान, अविनाश मुजुमदार, धनंजय रामलिंगे, सागर काकडे, सुमित कुडचे आदी मान्यवर उपस्थित होते.
यंदाचा ‘व्यापारी भूषण’ पुरस्कार विकी पॉलिमर्स प्रा. लि. चे दिलीप कुंभोजकर यांना प्रदान करण्यात आला. या तसेच सर्वोत्तम दुकान पुरस्कार जयश्री ग्रोसरी अँड ड्रायफ्रूट्सचे श्याम अग्रवाल, उत्कृष्ट विक्रेता कामगिरी पुरस्कार अरुणकुमार अँड कंपनीचे सचिन चांडक, कै. डॉ. धनंजय व साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार आशा मेहता, उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार तुळशीबागेतील सुवर्ण कलाकार स्वाती आंबासनकर आणि ‘फिनिक्स पुण्याचा अभिमान’ पुरस्कार दीपक केटरर्सचे दीपक व निखिल मालानी यांना प्रदान करण्यात आले. या सर्व पुरस्कारांचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व श्रीफळ असे होते.
विद्याधर अनास्कर यांनी व्यापाऱ्यांनी समाजाभिमुख दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन केले.
दिलीप कुंभोजकर म्हणाले, व्यापार करताना अभ्यासूवृत्ती जोपासणे अत्यंत गरजेचे आहे. माणसे वाचता आली पाहिजेत, चांगल्या अनुभवांमधून शिकावे आणि वाईट अनुभवांमधूनही मार्ग काढण्याची क्षमता विकसित करावी. पैशांपेक्षा जिवाभावाची माणसे जोडणारा व्यापारीच खऱ्या अर्थाने श्रीमंत ठरतो, असे त्यांनी नमूद केले.
- फोटो ओळ : स्टेशनरी, कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशनच्या वतीने व्यापारी एकता दिनानिमित्त एस. एम. जोशी सभागृहात वार्षिक पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवर व पुरस्कारार्थी.
