July 18, 2026

-पुस्तकी शिक्षण किंवा पाठांतरापेक्षा कौशल्य विकास आवश्यक

0
IMG-20260715-WA0025
Spread the love

महापौर मंजुषा नागपुरे ; क्लिन सायन्स अ‍ँड टेक्नॉलॉजी व निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे महाराष्ट्रातील ३ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्त्व

पुणे : काहीही झाले, कोणतीही परिस्थिती आली तरी देखील आपण शिक्षण थांबविता कामा नये. चांगले शिक्षण घेण्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. केवळ पुस्तकी शिक्षण किंवा पाठांतर महत्वाचे नाही, तर विद्यार्थ्यांनी स्वतःमधील कलागुण विकसित करून कौशल्य विकास करणे आवश्यक आहे, मूलभूत शिक्षणासोबतच कौशल्य विकास गरजेचा आहे, असे मत महापौर मंजुषा नागपुरे यांनी व्यक्त केले.

क्लिन सायन्स अ‍ँड टेक्नॉलॉजीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आणि पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ३ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत पुण्यातील २ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट प्रदान कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. यावेळी सीजीएसटी आयुक्त संजय कुमार, क्लिन सायन्स अ‍ँड टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक कृष्णकुमार बूब, नीलिमा बूब, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, अभिनेते विजय पटवर्धन, भगवंतराव मोरे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. नवनीत मानधनी, सचिव सीए दुर्गेश चांडक, कार्याध्यक्ष भारत वेदपाठक व्यासपीठावर उपस्थित होते.

कृष्णकुमार बूब म्हणाले, ज्यांना सहाय्य मिळू शकत नाही, अशा गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, हा आमचा हेतू आहे. क्लीन सायन्सच्या माध्यमातून शिक्षण, पाणी, वृक्ष संवर्धन आणि महिला सबलीकरण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य केले जाते. कौशल्य विकासाद्वारे महाराष्ट्रातील तरुणांना आत्मनिर्भर करण्याचाही आमचा प्रयत्न आहे. निरंजन सेवाभावी संस्थेचे गरजू विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शैक्षणिक पालकत्व योजनेचे कार्य अत्यंत स्तुत्य असून आम्ही यापुढेही त्यांच्यासोबत काम करू.

संजय कुमार म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीमधून बाहेर येण्यास शिक्षण हेच एकमेव माध्यम आहे. त्यातून आपल्या प्रत्येकाचा उत्तम विकास होतो. मेहनत आणि सचोटी आपल्यामध्ये असणे आवश्यक आहे. तसेच स्वप्न पाहणे आणि ते सत्यात उतरविण्यास प्रयत्न करण्याचे ध्येय प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवायला हवे.

डॉ.नवनीत मानधनी म्हणाले, गरजू व गरीब मुलांचे शैक्षणिक पालकत्त्व घेण्याचे कार्य संस्था अनेक वर्षे करीत आहे. मागील १३ वर्षांमध्ये तब्बल ३० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या शैक्षणिक किट मध्ये १६ प्रकारच्या वस्तू आहेत. यामध्ये सॅक, छत्री, भूमिती बॉक्स, टोपी, पॅड, पेन्सिल बॉक्स, डबा, रजिस्टर, चित्रकला वही, एकेरी वह्या – २०० पानी व ५२ पानी, दुरेघी वह्या – ५२ पानी, पाण्याची बाटली, बॉल पेन, रंगीत पेन अशा वर्षभर पुरेल अशा वस्तूंचा समावेश आहे.

चिमुकल्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पडावा आणि भविष्याच्या वाटा उज्ज्वल व्हाव्या, याकरीता संस्थेने बीडमधील दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेण्याच्या उपक्रमाला २०१२ साली सुरुवात केली. त्यानंतर पुणे, रायगडसह तोरणा, लोहगड, तुंग मधील व मुळशीतील नांदगाव मधील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले. त्यापाठोपाठ जम्मू-काश्मिरमधील आणि अहिल्यानगर मधील गरजू विद्यार्थ्यांना यामध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले. यावर्षी महाराष्ट्रातील ७५ हून अधिक शाळा व संस्थांतील विद्यार्थ्यांचा या उपक्रमात समावेश करण्यात आल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले. सीए दुर्गेश चांडक यांनी स्वागत केले. अंकिता शिवतारे यांनी सूत्रसंचालन केले. भारत वेदपाठक यांनी आभार मानले.

  • फोटो ओळ : क्लिन सायन्स अ‍ँड टेक्नॉलॉजीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आणि पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ३ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत पुण्यातील २ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट प्रदान कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी