May 31, 2026

ऑरेंज क्रांतीमध्ये भारताला अग्रेसर ठेवण्यासाठी नव्या पिढीने पुढे यावे : कुलगुरू सोनवणे

0
IMG-20260530-WA0025
Spread the love

– क्रिएटिव्ह इकॉनोमीवर आधारित ‘क्रिएटिव्ह इंजिन एक्सपो २०२६’ चे उद्घाटन उत्साहात संपन्न

पुणे / प्रतिनिधी: आगामी काळात ‘ऑरेंज क्रांती’मुळे युवकांसाठी रोजगार, उद्योग आणि नवसंशोधनाच्या अमर्याद संधी उपलब्ध होणार असून, या क्रांतीमध्ये भारताला जागतिक स्तरावर अग्रेसर ठेवण्यासाठी नव्या पिढीने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी केले.

पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथील प्रदर्शन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘क्रिएटिव्ह इंजिन एक्सपो 2026’ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन जिओ+हॉटस्टारचे प्रेसिडेंट आलोक जैन यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत, कंपनी थ्री चे सीईओ प्रफुल गाडे,अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, मनोज एरंडे, प्रदर्शनाचे मुख्य संयोजक तसेच सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संस्थापक संतोष रासकर,मंदार जोशी,रणजित हगवणे,सुनील भंडगे,संजय ठुबे,संजय पारीख आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आलोक जैन म्हणाले की, आगामी काळात ऑरेंज इकॉनोमी भारतीय अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक ठरणार आहे. भारताची समृद्ध संस्कृती, कला आणि परंपरा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञानाधारित मनोरंजन क्षेत्र प्रभावी भूमिका बजावू शकते.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी ‘क्रिएटिव्ह इंजिन एक्सपो’ हा मनोरंजन क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त आणि प्रेरणादायी उपक्रम असल्याचे सांगितले. “मनोरंजन क्षेत्रात कार्य करणारे तंत्रज्ञ, विद्यार्थी आणि कलावंत यांच्यासाठी हे प्रदर्शन एक अविस्मरणीय अनुभव ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रदर्शनाचे मुख्य संयोजक तसेच सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संस्थापक संतोष रासकर यांनी सांगितले की, “भारताला भविष्यात ‘ऑरेंज इकॉनॉमी’चे जागतिक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या नव्या आणि वेगाने वाढणाऱ्या आर्थिक व्यवस्थेबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.”

शनिवार, ३० मे आणि रविवार, ३१ मे २०२६ या दोन दिवसांमध्ये सकाळी १० ते रात्री ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले ठेवण्यात आले आहे. प्रदर्शनामध्ये क्रिएटिव्ह क्षेत्रातील विविध तंत्रज्ञान, संकल्पना आणि रोजगाराच्या संधींचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

कॉमिक्स, अॅनिमेशन, ग्राफिक्स, गेम्स, व्हिज्युअल इफेक्ट्स, डिजिटल शैक्षणिक साधने, वर्च्युअल प्रोडक्शन, 3D प्रिंटिंग, व्हर्च्युअल रिअॅलिटी आदी क्षेत्रांतील निर्मिती प्रक्रिया कशी घडते ? त्यामागील कल्पकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो याची माहिती तज्ज्ञांकडून दिली जाणार आहे.

तसेच या क्षेत्रामधून निर्माण होणाऱ्या रोजगार आणि उद्योगवाढीच्या संधींबाबत उपस्थित तज्ज्ञांशी संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध असून, क्रिएटिव्ह क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी