April 24, 2026

-मराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दअरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागात होणार स्थापना : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे मूर्ती सुपूर्द

0
IMG-20260424-WA0046
Spread the love

पुणे : भारतीय लष्करातील मराठा लाइट इन्फंट्रीतील सैनिकांची दगडूशेठ गणपतीशी निगडित असलेली श्रद्धा आणि परंपरा जपत, नव्याने स्थापन झालेल्या तसेच संवेदनशील भागात किंवा घटनांच्या वेळी कार्यरत राहण्यासाठी विशेष प्रशिक्षित असलेली १६ भैरव बटालियनला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पंचधातूची मूर्ती सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आली. बटालियनच्या मागे गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायम रहावा, या भावनेतून ही मूर्ती देण्यात आली आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे मंदिरात ही मूर्ती सुपूर्द करण्यात आली. मराठा लाइट इन्फंट्रीला गणपती मूर्ती देण्याची परंपरा पूर्वीपासूनच सुरू असून, त्याच परंपरेचा भाग म्हणून १६ भैरव बटालियनने दगडूशेठ गणपतीची मूर्ती देण्याची विनंती लेफ्टनंट कर्नल रणजीत सिंह सिनसिनवार यांनी सैनिकांच्या वतीने केली होती. त्यानुसार विधिवत पूजा करून सुमारे दीड फुट उंचीची पंचधातूची मूर्ती बटालियनच्या प्रतिनिधींना नुकतीच प्रदान करण्यात आली.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजू चिंचोरकर आदी उपस्थित होते. सदर बटालियन, मंदिराची प्रारंभिक स्थापना बेळगाव येथे करणार आहे. त्यानंतर बटालियनच्या ऑपरेशनल तैनातीप्रमाणे या मंदिराचे स्थलांतर अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागात करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, भारतीय लष्करातील मराठा लाइट इन्फंट्रीला आम्ही नेहमीच गणपती बाप्पाची मूर्ती देत आलो आहोत. बाप्पाचा आशीर्वाद या बटालियनच्या पाठीशी कायम राहावा, हीच आमची भावना आहे. १६ भैरव बटालियनसाठीही हीच श्रद्धा आणि भावनेतून मूर्ती सुपूर्द करण्यात आली असून, देशसेवेत असलेल्या आपल्या जवानांना यामुळे मानसिक आणि आध्यात्मिक बळ मिळेल.

आपल्या संस्कृतीमध्ये श्री काळभैरव आणि गणेश मंदिरात नग्न भैरव ही देवता रक्षणकर्ता म्हणून सज्ज असते. त्याचप्रमाणे ही बटालियन देशासाठी ऑपरेशन सिंदूर सह विविध महत्त्वाच्या घटनांमध्ये संरक्षण सज्जतेसाठी तयार करण्यात आली आहे. या बटालियनला देखील दगडूशेठ बाप्पा आशीर्वादरुपी बळ देतील, असा आम्हाला विश्वास आहे.

  • फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे भारतीय लष्करातील मराठा लाइट इन्फंट्रीतील नव्याने स्थापन झालेल्या तसेच संवेदनशील भागात किंवा घटनांच्या वेळी कार्यरत राहण्यासाठी विशेष प्रशिक्षित असलेली १६ भैरव बटालियनला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पंचधातूची मूर्ती सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी