पुणे महानगरपालिकेत कामगारांचे बेमुदत आंदोलनाचे हत्यार; ‘कामगार हितरक्षक संघ’ विविध मागण्यांसाठी आक्रमक
पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी ड्रायव्हरचा ओव्हरटाईम आणि नियमबाह्य काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई यांसह विविध पाच प्रमुख मागण्यांसाठी ‘कामगार हितरक्षक संघ, महाराष्ट्र राज्य’ या संघटनेने आता आक्रमक पवित्रा घेतला असून मागण्या तातडीने मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद भाकरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिकेत कार्यरत असलेल्या कंत्राटी ड्रायव्हरकडून नियमित वेळेपेक्षा जास्त काम करून घेतले जाते, मात्र त्यांना कायमस्वरूपी ड्रायव्हरप्रमाणे ओव्हरटाईमचा मोबदला दिला जात नाही, त्यामुळे त्यांना दररोज ४ तासांचा ओव्हरटाईम मंजूर करावा. याचबरोबर शासनाच्या दोन अपत्य धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या राम शंकर अडगळे आणि निलेश पद्माकर लगड या कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणीही संघटनेने लावून धरली आहे. तसेच विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयातील कायम कर्मचारी मधुकर नरसिंगे हे काम न करता पगार घेत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त कौर मॅडम यांनी भेटायला आलेल्यांना दोन तास ताटकळत ठेवून मागील दरवाजाने निघून गेल्याच्या प्रकाराचाही संघटनेने तीव्र निषेध केला आहे. याशिवाय, कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेले ड्रायव्हर संतोष सोनावले आणि राहुल गोसावी यांच्या पत्नीला वारसा हक्काने अद्याप कामावर सामावून न घेतल्याने कामगारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय न घेतल्यास कामगार हितरक्षक संघाच्या वतीने तीव्र बेमुदत आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा शरद भाकरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
