June 21, 2026

मानसी उपक्रमाच्या माध्यमातून संस्कारक्षम आणि निरोगी पिढी घडवण्याचा संकल्प : ना. चंद्रकांतदादा पाटील

0
IMG-20260621-WA0038
Spread the love

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वस्ती भागातील ३५०० मुलींकडून योग प्रात्यक्षिके

योगाच्या शास्त्रोक्त प्रशिक्षणासाठी ‘योग निकेतन’ची स्थापना

आपला समाज निरोगी आणि सुदृढ असावा, असा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आग्रह असून, मानसी उपक्रमाच्या माध्यमातून संस्कारक्षम आणि निरोगी पिढी घडवण्याचा संकल्प असल्याची भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मानसी प्रेरणा फाऊंडेशनच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वस्ती भागातील सुमारे ३,५०० मुलींनी उत्स्फूर्तपणे योग प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमात ना. चंद्रकांतदादा पाटील यांनीही सहभागी होत मुलींसोबत योगाभ्यास केला.

यावेळी बोलताना ना. पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्त्व जगभर पोहोचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना पुढे नेली. त्यानंतर योगाचा प्रचार आणि प्रसार जगातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाला आहे. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी, संतुलित आणि सकारात्मक जीवनशैलीची गुरुकिल्ली आहे.

ते पुढे म्हणाले की, स्त्री हा समाजाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे संस्कारक्षम, सशक्त आणि निरोगी समाज घडवण्यासाठी मुलींच्या सर्वांगीण विकासावर भर देणे आवश्यक आहे. मानसी उपक्रमाच्या माध्यमातून याच उद्देशाने सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. आज मानसी उपक्रमाचे स्वरूप हे एका प्रगत आणि सातत्याने विकसित होत जाणाऱ्या सामाजिक चळवळीचे झाले असून, नवजात बालकाच्या वाढीप्रमाणे हा उपक्रम दिवसेंदिवस विस्तारत आणि अधिक प्रभावी होत आहे.

याशिवाय, आगामी काळात भारताला मोठ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यजमानपद मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मानसी उपक्रमाच्या माध्यमातून किमान ५० महिला खेळाडू घडवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही ना. पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, योगाचे शास्त्रोक्त आणि दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी मानसी प्रेरणा फाऊंडेशन आणि नाशिकच्या योग विद्या गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘योग निकेतन’ या नव्या केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्राच्या लोगोचे अनावरण ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास मानसी प्रेरणा फाऊंडेशनच्या संचालिका मुग्धा भागवत, प्रभाग अध्यक्षा ॲड. वासंती जाधव, मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक पुनीत जोशी, नगरसेविका ॲड. मिताली सावळेकर, रेश्मा बराटे, माजी नगरसेविका व संचालक मंडळ सदस्या छाया मारणे, स्वाती मोहोळ, अद्वैत जोशी, माजी नगरसेवक दीपक पोटे, सुशील मेंगडे, डॉ. संदीप बुटाला, भाजप कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष गिरीश खत्री तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी