दगडूशेठ’ गणपती ट्रस्टच्या मोफत आरोग्य सेवा केंद्राचे लोकार्पण
जय गणेश रुग्णसेवा अभियान ; विविध प्रकारच्या तपासणी, औषधे व श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव मोफत मिळणार
पुणे : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारून सातत्याने समाजासाठी कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे साकारलेल्या मोफत आरोग्य सेवा केंद्राचे लोकार्पण झाले. सारसबागेजवळील बाबुराव सणस मैदानासमोर असलेल्या हिराबाग कोठी परिसरात हे केंद्र उभारण्यात आले आहे. यामध्ये रुग्णांना विविध प्रकारच्या तपासणी, औषधे व श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव मोफत मिळणार आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने उभारलेल्या या केंद्राचे उद्घाटन राज्याच्या आरोग्य सेवा विभागाचे संचालक डॉ.विजय कंदेवाढ यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉ.नीना बोराडे, आयएमए चे डॉ.विरेंद्र ओस्तवाल, डॉ.अमरीश दरक, डॉ.संदेश पटवर्धन, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह आरोग्य क्षेत्रातील मान्यवर, ट्रस्टचे पदाधिकारी व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. वैद्यकीय विभाग प्रमुख राजेंद्र परदेशी हे येथील व्यवस्था पहात आहेत.
डॉ. विजय कंदेवाढ म्हणाले, आज आरोग्यासाठी खूप काही करण्याची आवश्यकता आहे. ट्रस्टने उभारलेल्या का मोफत आरोग्य केंद्राचा लाभ गोरगरीब जनतेला होणार आहे. मोबाईल आरोग्य व्हॅन ही उत्तम संकल्पना असून दात, डोळे आणि कानाची तपासणी दुर्गम, ग्रामीण भागात करून आरोग्य सेवा देता येणार आहे.
हेमंत रासने म्हणाले, हजारो रुग्णांना दिलासा देण्याचे काम जया गणेश रुग्णसेवा अभियानाच्या माध्यमातून होत आहे. शासकीय व धर्मादाय यंत्रणांनी यामध्ये ट्रस्टला मोठे सहकार्य केले आहे. पुणे शहर आणि आपले महाराष्ट्र राज्य निरोगी राहावे, हा यामागील उद्देश आहे. सर्वाना आरोग्यसेवा तत्परतेने मिळतील असा प्रयत्न यामाध्यमातून केला जाणार आहे.
- सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते ५ पर्यंत मिळणार मोफत आरोग्य सेवा
मोफत आरोग्य सेवा केंद्र हे सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते ५ पर्यंत खुले राहणार असून येथे विविध प्रकारच्या तपासणी, औषधे व श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव मोफत मिळणार आहेत. यामध्ये विविध रक्त तपासणी, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, जनरल ओपीडी, हृदय ईसीजी, दंत तपासणी, दात काढणे, लहान बालकांकरिता लसीकरण सुविधा, कृत्रिम हात व पाय वाटप नोंदणी, श्रावण तपासणी होणार आहे. याकरिता तज्ज्ञ डॉक्टरांची टीम येथे कार्यरत असणार आहे. अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक ९८८१५१६५१७/ ९९२३५१६५१७ या क्रमांकावर संपर्क साधावा. तरी रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी केले आहे. - फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे साकारलेल्या मोफत आरोग्य सेवा केंद्राचे लोकार्पण झाले. सारसबागेजवळील बाबुराव सणस मैदानासमोर असलेल्या हिराबाग कोठी परिसरात हे केंद्र उभारण्यात आले आहे. यावेळी उपस्थित मान्यवर.
