अक्षय्यतृतीयेला ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महाभोगशारदेश मंगलम् विवाह सोहळा संपन्न ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट
पुणे : अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महाभोग दाखविण्यात आला. साडेतीन मुहूतार्पैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या मंगलदिनी दरवर्षी हा महा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. सनई व मंगलाष्टकांचे स्वर… लग्नसोहळ्यासाठी सजलेला मंडप आणि शुभमंगल सावधान च्या मंगल स्वरांत मंदिरात श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. याच दिवशी गणरायाचे दर्शन व्हावे, याकरिता भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी देसाई आंबेवालेचे संचालक मंदार देसाई कुटुंबियांच्यावतीने हा नैवेद्य देण्यात आला.
गाणपत्य सांप्रदायातील परंपरेनुसार विवाह सोहळ्याचे आयोजन देखील केले जाते. दुपारी १२ वाजून ४७ मिनिटांनी भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह म्हणजेच शारदेश मंगलम् सोहळा थाटात पार पडला. संकेत मते यांसह तुषार रायकर यांनी सपत्नीक पूजन केले. रात्री भारतीय वारकरी महिला मंडळाच्यावतीने उटीचे भजन देखील आयोजित करण्यात आले होते.
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, श्री गणेशांच्या दोन शक्तींना गाणपत्य संप्रदायात देवी सिद्धी आणि देवी बुद्धी या नावाने आळविले जाते. भगवंताच्या क्रियाशक्तीला देवी सिद्धी असे म्हणतात, तर भगवंताच्या ज्ञानशक्तीला देवी बुद्धी असे म्हणतात. अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतू असल्याने या काळात प्रगट झालेल्या देवी बुद्धीला शारदा असे म्हणतात. शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे तिची उज्ज्वलता, आल्हाददायकता असल्याने तिला शारदा असे म्हणतात. शरद ऋतू मधील प्रसन्नतेप्रमाणे देवी बुद्धीने प्रसन्नता प्राप्त होत असल्याने तिला शारदा असे म्हणतात. अशा देवी शारदेचा भगवान श्री गणेशांसोबतच्या महामीलनाचा सोहळा म्हणजे श्री शारदेश मंगलम आहे.
मंदिरात रविवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक झाला. त्यानंतर पहाटे ४ वाजता गायिका विदुषी मंजुषा पाटील यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. सकाळी ८ वाजता गणेशयाग देखील झाला. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना तसेच वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व मंदिरात भाविकांना देण्यात येणार आहे.
फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. तसेच शुभमंगल सावधान च्या मंगल स्वरांत मंदिरात श्री गणेश आणि देवी शारदा शारदेश मंगलम् विवाह सोहळा संपन्न झाला.
