देशाला एकसंघ राखणारे संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिले नसते तर या देशाचे तुकडे झाले असते – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई/हैद्राबाद दि.17 – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्गाबाहेर बसुन शालेय शिक्षण घेतले. शाळेबाहेर बसुन शिकणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या संविधानाचे शिल्पकार झाले. संविधानाच्या निर्मीती आधी भारत पाकिस्तान असे दोन तुकडे झाले होते. जात, धर्म, प्रांत आणि भाषेची विविधता असणाऱ्या भारत देशाला एकसंघ राखणारे राष्ट्रीय एकात्मता शिकवणारे संविधान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिले. त्यामुळे आज हा देश एकसंघ आहे. जर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राष्ट्रीय एकात्मतेच्या धाग्यात बांधणारे संविधान दिले नसते तर या देशाचे तुकडे तुकडे झाले असते असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
हैद्राबाद येथील तेलंगाणामधील मलकाजगुरु या जिल्हयात कुतबल्लापूर येथे आयोजित केलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमीत्त आयोजित कार्यक्रमात ना.रामदास आठवले बोलत होते.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रणित भिमराज संघटनेची स्थापना करण्यात आली. रिपब्लिकन पक्ष प्रणित भिमराज सेनेच्या अध्यक्षपदी राजेश कांबळे यांची घोषणा ना. रामदास आठवले यांनी केली. तेलंगाणामध्ये रिपब्लिकन पक्षासोबत भिमराज सेनाही काम करणार आहे. रिपब्लिकन पक्षाचा भाग म्हणुनच भिमराज सेनेचे अध्यक्ष राजेश कांबळे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते हे तेलंगाणामध्ये रिपब्लिकन पक्ष वाढवतील असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमात पुज्य भदंत हर्षबोधी महाथेरो हे बुध्दगयेवरुन खास या जयंती उत्सवात उपस्थित राहण्यासाठी आले होते. यावेळी पुज्य भंते हर्षबोधी महाथेरो यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभी बुध्दवंदना घेवुन जयंती उत्सवास प्रारंभ केला.
तेलंगाना आणि कर्नाटक सीमावर्ती भागात लोकप्रिय संघटना असणा-या भिमराज सेनेचे रिपब्लिकन पक्षात विलीनीकरण करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातुन भिमराज सेना या भागात रिपब्लिकन पक्षाचे काम करणार असल्याची घोषणा राजेश कांबळे यांनी या कार्यक्रमात केली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे तेलंगाणामधील रिपब्लिकन पक्षाचे आंध्रप्रदेश अध्यक्ष ब्रम्हानंद रेड्डी, तेलंगणाचे प्रमुख रवि कुमार पसुला, परमशिवा नागेश्वर राव , गोरख सिंग, रोजा राणी, आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.
दलित पँथर सारख्या आक्रमक संघटनेच मी नेतृत्व केले .अन्याय अत्याचार होईल तिथे धावुन गेलो. संपूर्ण देशात गावागावात मी गेलो. गावोगावी जाऊन दलित सवर्णामध्ये भांडणे लावली नाहीत तर दलित सवर्णामधील वाद मिटवलेत. दलित सवर्णांना एकजुट करण्याचे काम मी केले. दलित सवर्णांमध्ये सामाजिक ऐक्य व्हावे ही माझी इच्छा असुन त्यासाठी माझे काम सुरु आहे असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भाषावार प्रांत रचना हा ग्रंथ लिहला. त्यांनी लिहीलेल्या भाषावार प्रांत रचनेच्या संकल्पनेतुनच भारतात राज्यांची
निर्मीती झाली. संविधानामुळे भारत संघराज्य म्हणून एकजुटीने मजबूत उभे आहे. आपल्या देशात समता, सामाजिक न्याय, राष्ट्रीय एकात्मता, बंधुता, सर्वधर्म समभाव या संविधानीक मुल्यांचा आपण प्रचार केला पाहिजे. त्यातुनच भारत देशाचा विकास होईल. भारतात एकता आणि अखंडता मजबुत राहील. सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत व्हावी हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती. त्यानुसार आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातील भारत उभा केला पाहिजे. असे ना. रामदास आठवले म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी मी देशभर फिरत आहे. देशातील 28 राज्यात आणि 8 केंद्रशासीत प्रदेशात मी रिपब्लिकन पक्ष पोहचवला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील आरपीआय हा आपआपल्या भागात मजबुत करण्याचा संकल्प करा हेच खरे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ठरेल असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले.
महात्मा ज्योतीबा फुले, क्रांतीबाई सावित्रीमाई फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जर झाले नसते तर दिवंगत इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होवु शकल्या नसत्या. मायावती; ममता बॅनर्जी; जयललिता या मुख्यमंत्री होवु शकल्या नसत्या. त्यामुळे भारतीय स्त्रियांवर फुले आंबेडकरांचे अनंत उपकार असल्याचे प्रतिपादन ना रामदास आठवले यांनी केले.
यावेळी पूज्य भदंत हर्षवोधी महाथेरो यांनी रिपब्लिकन पक्ष हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आहे.रिपब्लिकन पक्षाचा प्रचार भिख्खू संघाने ही केला पाहिजे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष देशभर पोहोचवत आहेत त्यांना धम्म बळाचा पाठिंबा भिक्खू संघाच्या आशीर्वादातून मिळत आहे असे भदंत हर्ष बोधी म्हणाले.
हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख
