नागरिक सोशल फाउंडेशन तर्फे ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन
-क्रांती दिनी होणार वंदेमातरमचा भव्य जागर
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त तसेच ९ ऑगस्ट ‘क्रांती दिना’चे औचित्य साधून नागरिक सोशल फाउंडेशनच्या मूल्य शिक्षण विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘संपूर्ण वंदे मातरम् समूहगीत गायन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रभक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये अधिक दृढ व्हावी आणि नवीन पिढीला संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीत पाठ व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे, अशी माहिती नागरिक सोशल फाउंडेशनच्या शीतल गोडबोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संस्थेचे विश्वस्त अमेय सप्रे उपस्थित होते.
ही स्पर्धा रविवार, दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत डी. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल येथे होणार आहे. स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवी अशा दोन गटांत आयोजित करण्यात आली असून प्रत्येक संघात १० विद्यार्थी गायक असणे आवश्यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५ ते १० विद्यार्थ्यांचा स्वतंत्र गट ठेवण्यात आला असून त्यांचे परीक्षण स्वतंत्र निकषांनुसार करण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी नावनोंदणीची अंतिम मुदत ३० जुलै २०२६ असून इच्छुक शाळांनी नागरिक सोशल फाउंडेशनच्या www.nagariksocialfoundation.org या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच तीन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून स्पर्धेनंतर लगेचच पारितोषिक वितरण समारंभही आयोजित करण्यात येणार आहे.
शाळांनी मोठ्या संख्येने या राष्ट्रभक्तीपर उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नागरिक सोशल फाउंडेशनच्या मूल्य शिक्षण विभागाने केले आहे. स्पर्धेसाठी अत्यंत नाममात्र प्रवेश शुल्क आकारण्यात येणार असून अधिक माहितीसाठी ९४२२०००४६९ किंवा ७७९८९८२०२१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
