‘शिवकालीन सरदारांचे वंशज’ यांच्या हस्ते डॉ. गौरव पोपट घोडे ‘धर्मरक्षक’ पुरस्काराने सन्मानित -भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शन उत्साहात संपन्न
पुणे : शिवकालीन इतिहास, परंपरा आणि संस्कृतीच्या जतनासाठी उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. गौरव पोपट घोडे यांना ‘धर्मरक्षक’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत मोलाचे योगदान देणाऱ्या शिवकालीन सरदारांच्या घराण्यांच्या वंशजांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास मिलिंद एकबोटे (गुरुजी गोरक्षक),डॉ स्वयंप्रभा देवी मोहिते पाटील, सिद्धार्थ कंक (श्री येसाजी कंक यांचे वंशज), संदेश देशपांडे (श्री बाजी प्रभू देशपांडे यांचे वंशज), दादासो नाईक जाधव (श्री बहिर्जी नाईक यांचे वंशज), सयाजीराव गुजर (श्री सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज), श्रीनिवास इंदलकर (श्री हिरोजी इंदलकर यांचे वंशज), अमित गाडेपाटील (श्री वीरमाता धाराऊ यांचे वंशज), रघुनाथराव डूबल इनामदार (श्री सरदार बाकोजी डूबल इनामदार यांचे वंशज),सुधीर तारे,वैभव भगत तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कर्नाटकातील होदिगेरे येथे असलेल्या स्वराज्य संकल्पक श्रीमंत शहाजीराजे भोसले यांच्या दुर्लक्षित समाधीस्थळावर ४५० किलो वजनाची आकर्षक मेघडंबरी बसवून ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. गौरव घोडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये काशिनाथ ओझरकर, सुनील ढवळे, महावीर पाटोळे, अविनाश कदम, प्रसाद चव्हाण आणि आकाश चव्हाण यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी डॉ. घोडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत इतिहास संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला. तसेच स्वराज्याचा इतिहास, पराक्रम आणि संस्कृती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला इतिहासप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तलवारी, कट्यारी, भाले आणि अन्य ऐतिहासिक शस्त्रांच्या प्रदर्शनाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. प्रदर्शनातून शिवकालीन युद्धकला, शौर्य आणि स्वराज्याच्या गौरवशाली परंपरेची माहिती नागरिकांना मिळाली.
कार्यक्रमाचे आयोजन जयाजीराव शामराव बाजी मोहिते (श्री सरनोबत हंबीरराव बाजी मोहिते यांचे वंशज) आणि श्री स्वामी ॐ मल्हारी प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी सूर्यवंशी यांनी केले, तर रवींद्र जगदाळे यांनी आभार प्रदर्शन केले.
