September 12, 2026

पाचव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचेयेत्या २६ व २७ सप्टेंबरला यशदामध्ये आयोजन

0
sanvidhan_news_150x150
Spread the love
  • जागतिक पर्यटन दिनानिमित्त दोन दिवस चित्रपटांतून घडणार पर्यटनाची सफर

पुणे : जागतिक पर्यटन दिनानिमित्त परभन्ना फाउंडेशन, महाराष्ट्र पर्यटन विभाग, दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. बाणेर येथील यशदामध्ये येत्या २६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी हा दोन दिवसीय महोत्सव होणार असून, महोत्सवामध्ये लघुपटांच्या प्रदर्शनासोबतच मुलाखती, परिसंवाद, समूहचर्चा आणि मास्टरक्लास आदी संवादात्मक सत्रे होणार आहेत, अशी माहिती परभन्ना फाउंडेशनचे प्रमुख व महोत्सवाचे प्रमुख संयोजक गणेश चप्पलवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी महोत्सव सल्लागार समितीचे सदस्य डॉ. राजीव घोडे, जीवराज चोले, एथिकल ट्रॅव्हल प्रोफेशनल असोसिएशनचे (ईटीपीए) अध्यक्ष सुशील पाटील, समन्वय समिती सदस्य पवन घटकांबळे, अजित मांदळे, साहिल भोसले आणि असीम त्रिभुवन, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन पुणेचे (टॅप) अध्यक्ष निलेश भन्साळी, उपाध्यक्ष अमित पंडित, ‘ईटीपीए’च्या खजिनदार प्राची खळदकर आदी उपस्थित होते.

गणेश चप्पलवार म्हणाले, “चित्रपट उद्योग आणि पर्यटन क्षेत्र यांच्यातील परस्पर संबंध अधिक दृढ करण्याबरोबरच चित्रपटाचा अभ्यास करणारे विद्यार्थी, शैक्षणिक क्षेत्र, पर्यटन व्यावसायिक, ट्रॅव्हल क्रिएटर्स आणि व्लॉगर्स यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे, सांस्कृतिक परंपरा आणि समृद्ध वारसा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम ठरू शकते. त्यामुळे ‘चित्रपटांच्या माध्यमातून पर्यटनाचा प्रचार’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या महोत्सवासाठी लघुपट, माहितीपट, व्लॉग आणि विद्यार्थी चित्रपट अशा विविध विभागांतून प्रवेशिका प्राप्त झाल्या असून, त्यातील अंतिम निवड झालेले ३० हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. पर्यटनविषयक सर्जनशील कथाकथनाला प्रोत्साहन देणे आणि नवोदित तसेच अनुभवी चित्रपट निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.”

डॉ. राजीव घोडे म्हणाले, “या महोत्सवाला ज्येष्ठ संपादक संजय आवटे, महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य विभाग आणि मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाचे उपसचिव विजय पोवार, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे अध्यक्ष सचिन इटकर, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांतसाजनीकर, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या मुख्य वित्तीय अधिकारी चित्रलेखा खातू व चित्रपट उद्योगातील मान्यवर आदी उपस्थित असणार आहेत. वैशाली केंदळे, संतोष पठारे, अनमोल कोठाडिया यांनी महोत्सवाचे परीक्षक म्हणून काम पहिले आहे.”

सकाळी ११ ते ७ या वेळेत होणाऱ्या या महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट, उपविजेता, विशेष परीक्षक उल्लेख आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, तसेच माहितीपट आणि व्लॉग विभागातील पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. विद्यार्थी विभागात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी लघुपट, माहितीपट आणि व्लॉगसाठी पुरस्कार दिले जातील. प्रवासवर्णन स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांचाही गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय महाराष्ट्र पर्यटन आणि वारी पर्यटनासाठी विशेष सन्मान पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर आणि नागपूर येथूनही प्रेक्षक व प्रतिनिधी महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. चित्रपट निर्माते, कलाकार, लेखक, छायाचित्रण दिग्दर्शक, कला दिग्दर्शक, विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ, पर्यटन व्यावसायिक आणि पर्यटनप्रेमींसाठी हा महोत्सव महत्त्वाचा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी