September 12, 2026

श्रीमंत ‘दगडूशेठ’ हलवाई गणपती ट्रस्टच्या ‘प्रेम मंदिर’ सजावटीचे उद्घाटन सोमवारी (दि.१४)

0
IMG-20260910-WA0065
Spread the love


श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजाचार्य श्री राधावल्लभ मंदिराचे १८ वे तिलकायत अधिकारी श्रीहित मोहितमराल गोस्वामीजी महाराज (वृंदावन, उत्तरप्रदेश) यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना ; सायंकाळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते विद्युत रोषणाईचे उद्घाटन

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३४ व्या वर्षी गणेशोत्सवात वृंदावन मधील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. गणेश चतुर्थीला सोमवार, दिनांक १४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी उत्तरप्रदेश वृंदावन येथील श्री राधावल्लभ मंदिराचे १८ वे तिलकायत अधिकारी श्रीहित मोहितमराल गोस्वामीजी महाराज यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन सायंकाळी ७ वाजता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होईल, अशी माहिती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सोमवारी (दि.१४) प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या मयूर रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. विविध प्रकारच्या आकर्षक फुलांनी रथ सजविण्यात येणार आहे. प्रतिष्ठापनेनंतर उत्सवमंडपात दुपारी १२ पासून भाविकांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घ्यावा.

श्री राधा-कृष्णांप्रती असलेले दिव्य प्रेम, भक्तीचा वास असलेल्या प्रेम मंदिराची तेजस्वी प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवात साकारण्यात आली असून भाविकांकरिता प्रेमभावनेत तल्लीन करणारा आध्यात्मिक प्रवास यानिमित्ताने घडविण्यात येणार आहे. नानाविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट इतकी असेल. जिथे भक्ती प्रेम बनते आणि प्रेम देवत्व बनते या संकल्पनेवर आधारित ही भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

प्रतिकृतीच्या रचनेत संगमरवरी वास्तुकलेपासून प्रेरित भव्य दर्शन भाग असणार आहे. उत्तर भारतीय मंदिराच्या पारंपरिक रचनेचे प्रतिबिंब दर्शवणारी कलाकुसर केलेले स्तंभ आणि घुमट, रासलीला, गोवर्धन लीला, झुला यांसारख्या कृष्णलीला दर्शविणारे शिल्पपट देखील असणार आहेत. शोभिवंत फुलांची सजावट, पवित्र शुभचिन्हे आणि आकर्षक विद्युतरोषणाईमुळे सायंकाळनंतर हे मंदिर उजळून निघणार आहे.

प्रारंभी बुधवार चौकामध्ये भव्य कमान साकारण्यात येणार असून त्यावर आकर्षक नक्षीकाम पहायला मिळेल. मुख्य प्रतिकृतीच्या दोन्ही बाजूंना असलेल्या रनिंग मांडवावर कृष्णलीलेतील विविध प्रसंग साकारण्यात आले आहेत. मंदिराच्या वर दर्शनी भागात राधा-कृष्णाची भव्य मूर्ती देखील आहे. प्रतिकृतीचा आकार १२० फूट लांब, ९० फूट रुंद आणि १०० फूट उंच असणार आहे. यामध्ये अनेक भव्य खांब असून विविध मूर्ती देखील असणार आहेत. गाभारा व मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रींचे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक नितेश कुमार आणि ग्लिटरी इव्हेंट्स प्रा. लि. यांनी मंदिराच्या प्रतिकृतीचे काम केले आहे.

ॠषिपंचमीनिमित्त ३५ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण

मंगळवार, दिनांक १५ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ३५ हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, विभागीय आयुक्त शीतल तेली – उगले उपस्थित राहणार आहेत. रात्री १० ते १२ वाजेपर्यंत हरी जागर च्या माध्यमातून महाराष्ट्रातील वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. उत्सवांतर्गत सामूहिक सूर्यनमस्कार, अग्निहोत्र, वेदपठण, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत. दररोज पहाटे ५ पासून महाअभिषेक पूजा होणार असून सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत मिलींद राहुरकर शास्त्री हे गणेशयाग आणि दुपारी १ ते ५ यावेळेत दाक्षिणात्य पद्धतीने नटराजशास्त्री यांच्या उपस्थितीत गणेशयाग होणार आहे. भाविकांना स्वहस्ते अभिषेक पहाटे ५ ते सायंकाळी ५ यावेळेत मंडपात करता येणार आहेत.

उत्सवमंडपात दि. २४ सप्टेंबर सामुहिक सत्यविनायक पूजेचे आयोजन

उत्सवमंडपात दिनांक २४ सप्टेंबर रोजी सामुहिक सत्यविनायक पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यविनायक पूजा ही भगवान शंकर व पार्वती मातेला ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिशक्ती, सूर्य या पाच देवतांनी सांगितली असल्याचे सत्यविनायक पोथीत सांगण्यात आले आहे. सत्यविनायक पूजेला अनन्यसाधारण महत्व असून ते भाविकांपर्यंत यामाध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे.

उत्सवात श्रीं ना दररोज विविध पदार्थांचा भोग लावण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी भक्तांना प्रसाद म्हणून त्याचे वितरण केले जाईल. मंदिर व उत्सव मंडप परिसरात येणा-या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. दररोज पहाटे ५ ते ६ यावेळेत विविध शाळांतील विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. एकादशीच्या दिवशी दि. २२ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता मंत्र जागर होणार आहे. तर, दि. २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला श्रींची वैभवशाली सांगता मिरवणूक श्री वक्रतुंड रथातून निघणार आहे.

गणेशोत्सवात जय गणेश आरोग्यसेवा

अभियानांतर्गत ३ ठिकाणी केंद्र, मोफत रुग्णवाहिका सेवा आणि आयसीयू
जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत जय गणेश प्रांगणासह मंदिर परिसरात ३ ठिकाणी सुसज्ज अशी २४ तास मोफत वैद्यकीय मदत केंद्र सिटी पोस्ट, गणपती मंदिर व मांगल्य मंगल कार्यालयजवळ येथे असणार आहेत. याशिवाय भारती हॉस्पिटल रिसर्च सेंटर धनकवडी, सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, जहांगिर हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक, डॉ.डी.वाय. पाटील हॉस्पिटल पिंपरी, संचेती हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल स्वारगेट येथे मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. गणपती मंदिराजवळ महाराष्ट्र राज्य उपसंचालक आरोग्य सेवा पुणे तर्फे २४ तास मोफत व्हेंटिलेटर/ आयसीयू १० बेडची सुविधा देण्यात येईल. उत्सवकाळात ५५ वैद्यकीय तज्ज्ञाची टीम २४ तास कार्यरत राहणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने १०८ क्रमांकाच्या ५ रुग्णवाहिका आणि ट्रस्टच्या ४ रुग्णवाहिका उत्सवकाळात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड परिसरात विनामूल्य स्वरुपात कार्यरत असणार आहेत. वैद्यकीय मदत केंद्रावर तसेच रुग्णवाहिकांच्या येथे मोफत औषधे देण्यात येणार असून आरोग्य विषयक सर्वतोपरी मदत भाविकांना देण्याची सुविधा ट्रस्टने उपलब्ध करुन दिली आहे.

रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्ण, वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना थेट दर्शनाची सोय आणि व्यसनमुक्ती जनजागृती चळवळ

रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णांना तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना गणेशोत्सवात उत्सव मंडपात येऊन बाप्पाचे दर्शन घेणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या करता गेल्या दहा वर्षापासून ऑगमेंटेड रियालिटी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊन रुग्ण व ज्येष्ठांना बाप्पाचे दर्शन मिळवून देण्याची सुविधा करण्यात आली आहे. यंदा देखील या तंत्रज्ञानाद्वारे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. याशिवाय व्यसनमुक्ती जनजागृती चळवळ देखील राबविण्यात येणार असून उत्सव मंडपामध्ये या विषयाची जनजागृती करणारे विविध फलक लावण्यात येतील. ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्टच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडणार आहे.

गणेशभक्तांसाठी ५० कोटींचा विमा व उत्सवावर तब्बल १५० कॅमे-यांचा वॉच व ४ एलईडी स्क्रिनची सोय

पुणे शहर मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा यांसह कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दींतर्गत गणेशभक्तांसाठी तब्बल ५० कोटींचा विमा ट्रस्टतर्फे काढण्यात आला आहे. यामध्ये चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला वा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. यामध्ये अपघाती मृत्यु झाल्यास प्रति व्यक्तीला ५ लाख रुपये, अपघातात अंशत: अपंगत्त्व आल्यास २ लाख रुपये आणि अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्ती ५० हजार रुपयांपर्यंत औषधाचा खर्च देण्यात येईल. उत्सवकाळात ही विम्याची सुविधा असणार आहे.

श्रीं चे दर्शन भाविकांना एलईडी स्क्रिनद्वारे घेता यावे, याकरिता ४ एलईडी स्क्रिन लावण्यात येणार आहेत. उत्सव मंडपात लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर व मूळचंद दुकानाशेजारी अशा तीन एलईडी स्क्रिन तसेच बुधवार चौक येथे एक स्क्रिन लावण्यात येणार आहेत. श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच फरासखाना चौक, बाबू गेनू गणपती, कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर, सिटी पोस्ट अशा परिसरात देखील सीसीटिव्ही कॅमेरे असणार आहेत. याशिवाय मंदिर परिसरात कायमस्वरुपी असलेल्या कॅमे-यांचा वॉच उत्सवावर असणार आहे. त्यामुळे तब्बल १५० कॅमे-यांद्वारे या परिसरावर पोलीस यंत्रणेसोबत ट्रस्टची २५० पुरुष व महिला यांची खासगी सुरक्षाव्यवस्था लक्ष ठेवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी