August 30, 2026

स्नायूंना इजा न पोहोचवता झाली टोटल हिप रिप्लेसमेंट

0
sanvidhan_news_150x150
Spread the love


४२ वर्षीय व्यक्ती शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी चालू लागला.
पुणे, २६ ऑगस्ट २०२६: दुचाकी अपघातात मांडीच्या हाडाच्या गोलाकार भागाला फ्रॅक्चर झाल्याने पुण्यातील ४२ वर्षीय व्यक्तीची टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे डायरेक्ट अँटीरीअर अँप्रोच (डीएए) ही पद्धती वापरून मांडीच्या हाडाच्या आजूबाजूच्या स्नायूंना कोणतीही इजा न पोहोचवता ही शस्त्रक्रिया झाल्याने रुग्ण दुसऱ्याच दिवशी शस्त्रक्रिया झालेल्या पायावर पूर्ण वजन देऊन चालू शकला.सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे येथे ही शस्त्रक्रिया पार पडली.
डीएए या पद्धतीत सभोवतालच्या स्नायूंना इजा न पोहोचवता समोरून हिप जॉइंटपर्यंत पोहोचले जाते. ही अत्याधुनिक पद्धती असून या मुळे आजूबाजूच्या स्नायूंना कोणतीही दुखापत होत नाही. दुचाकीवरून पडल्यानंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील तपासणीत डाव्या कॉलरबोनचे (क्लॅव्हिकल) फ्रॅक्चर आणि फिमोरल हेड (मांडीच्या हाडाचा वरचा गोलाकार भाग जो हिप जॉइंट बनवतो) विस्थापित झाल्याचे आढळले. फिमोरल हेड फ्रॅक्चरवर उपचाराचा एक पर्याय म्हणजे फ्रॅक्चर झालेले हाड पूर्ववत करून ते स्क्रूने जोडणे हा होता. पण, यासाठी सुमारे सहा ते आठ आठवडे पायावर वजन न देण्याचे निर्बंध पाळावे लागले असते, शिवाय हाड योग्यरित्या न जुळणे आणि रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हाडांच्या पेशी खराब होणे (अव्हॅस्कुलर नेक्रोसिस – एव्हीएन) यांसारखे धोकेही होते.
रुग्णाचे वय, क्रियाशीलतेची पातळी आणि दैनंदिन गरजा लक्षात घेऊन वैद्यकीय टीमने डायरेक्ट अँटिरियर अप्रोचचा वापर करून टोटल हिप रिप्लेसमेंट करण्याचा पर्याय निवडला. या तंत्रात, सर्जन्स स्नायूंच्या मधील जागेतून समोरच्या बाजूने हिप जॉइंटपर्यंत पोहोचतात, ज्यामुळे सभोवतालच्या स्नायूंच्या उती सुरक्षित राहण्यास मदत होते आणि रुग्णाला लवकर हालचाल करणे शक्य होते.
सह्याद्रि हॉस्पिटल, येथील कंसल्टण्ट ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अभिजित आगाशे म्हणाले, “फिमोरल हेडचे फ्रॅक्चर विस्थापित झालेल्या कमी वयाच्या रुग्णासाठी उपचारात तात्काळ फ्रॅक्चर बरे करणे आणि दीर्घकालीन कार्यक्षमता पूर्ववत करणे या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो. डायरेक्ट अँटिरियर अप्रोचमुळे सांध्याभोवतालचे महत्त्वाचे स्नायू सुरक्षित ठेवून नैसर्गिक उतींच्या स्तरामधून हिपपर्यंत पोहोचता येते. या केसमध्ये रुग्ण दुसऱ्याच दिवशी पायावर पूर्ण वजन देऊ शकला आणि त्याने लवकर पुनर्वसन सुरू केले, जे त्याची हालचाल पूर्ववत करण्यासाठी आणि त्याला दैनंदिन दिनचर्येत परत आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.”
भारतातील संशोधनांमधील पुराव्यांनी देखील डायरेक्ट अँटिरियर अप्रोचमुळे कार्यात्मक परिणाम सकारात्मक मिळाल्याचे स्पष्ट केले आहे. भारतामधील २२ ते ५० वयोगटातील ७६ रुग्णांचा समावेश असलेल्या २०२६ मधील संशोधनामधून निदर्शनास आले की, ४०.८ टक्‍के रुग्णांना २४ तासांच्या आत डिस्चार्ज दिला जाऊ शकला, तसेच शस्त्रक्रियेनंतर कोणतीही गंभीर गुंतागुंत झाली नाही किंवा त्यांना पुन्हा दाखल करावे लागले नाही. एका वर्षात हिप-फंक्शनच्या सरासरी स्कोअरमध्ये ४४.६ वरून ९७.१ पर्यंत लक्षणीय सुधारणा झाली. भारतातील १५७ रुग्णांचा समावेश असलेल्या संशोधनामध्ये डीएए पद्धतीनंतर कार्यात्मक क्षमतेत मोठी सुधारणा झाल्याची नोंद झाली, तसेच या तंत्रातील शिकण्याच्या प्रक्रियेमुळे सर्जनचा अनुभव आणि योग्य रुग्णाची निवड करण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
प्रक्रियेनंतर रुग्ण दुसऱ्याच दिवशी पायावर पूर्ण वजन देऊ शकला आणि त्याने हालचाल करण्यास सुरुवात केली. हॉस्पिटलमधील मुक्कामादरम्यान त्याची प्रकृती उत्तमरीत्या सुधारली आणि त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. कॉलरबोनच्या फ्रॅक्चरवर क्लॅव्हिक्युलर ब्रेसचा वापर करून विनाशस्त्रक्रिया उपचार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी