August 20, 2026

सतरा सेंटीमीटरचा ट्युमर काढला अन् व्हीलचेअरवरचा आयटी इंजिनिअर पुन्हा चालू लागला

0
sanvidhan_news_150x150
Spread the love


पुण्यातील डॉक्टरांनी अॅडव्हान्स्ड मायक्रोसर्जरीच्या माध्यमातून १७ सेमी लांबीचा पाठीच्या कण्यातील दुर्मिळ ट्यूमर यशस्वीपणे काढला
मणिपाल हॉस्पिटल खराडी येथील अॅडव्हान्स्ड मायक्रोस्कोपिक स्पाइन सर्जरीमुळे वर्षानुवर्षांच्या अपंगत्वानंतर आयटी इंजिनिअरची शारीरिक हालचाल पुन्हा पूर्ववत झाली
पुणे, ऑगस्ट २०२६: मणिपाल हॉस्पिटल खराडी येथील डॉक्टरांनी पुण्यातील एका ५२ वर्षीय वरिष्ठ आयटी इंजिनिअरच्या पाठीच्या कण्यातून १७ सेमी लांबीचा दुर्मिळ आणि बेनाइन (विना-कर्करोगजन्य) ट्यूमर यशस्वीपणे काढून टाकला. पाठीच्या कण्यामधील मज्जातंतूंवर पडणाऱ्या सततच्या दाबामुळे हा रुग्ण गेल्या सात वर्षांपासून व्हीलचेअरवर होता. अॅडव्हान्स्ड मायक्रोस्कोपिक स्पाइन सर्जरीनंतर हा रूग्ण पुन्हा उभा राहून आधार घेत चालू लागला आहे, तसेच हळूहळू पुन्हा आपली दैनंदिन कामे करू लागला आहे.
रुग्ण महेश पाटील (नाव बदलले आहे) यांना सुरुवातीला डाव्या पायात सतत वेदना आणि बधीरता जाणवत होती. अनेक डॉक्टरांचा सल्ला घेऊनही बऱ्याच काळापर्यंत यामागचे कारण स्पष्ट झाले नाही. ही स्थिती वाढत गेली, तशी त्यांच्या दोन्ही पायांमध्ये तीव्र अशक्तपणा निर्माण झाला आणि हळूहळू त्यांची चालण्याची क्षमता पूर्णपणे निघून गेली. या आजाराचा त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही जीवनावर परिणाम झाला. ते कामासाठी प्रवास करू शकत नव्हते, दीर्घकाळ बसू शकत नव्हते किंवा स्वतंत्रपणे दैनंदिन कामे करू शकत नव्हते. नंतर केलेल्या एमआरआय स्कॅनमध्ये पाठीच्या कण्यात मोठा ट्यूमर असल्याचे निदर्शनास आले, ज्यानंतर पुढील प्रगत उपचारांसाठी त्यांना मणिपाल हॉस्पिटल खराडी येथे पाठवण्यात आले.
या केसबाबत मत व्यक्त करत मणिपाल हॉस्पिटल खराडी येथील स्पाइन सर्जरीचे कन्सल्टंट डॉ. प्रविण सुरवशे म्हणाले, “रुग्णाला सुमारे १७ सेमी आकाराचा मोठा इंट्राड्यूरल एक्स्ट्रामेड्युलरी (आयडीईएम) श्वानोमा (मणक्याच्या संरक्षणात्मक आवरणाच्या आत आणि मज्जातंतूंच्या बाहेर वाढणारी गाठ) असल्याचे निदान झाले होते. श्वानोमा सामान्यतः पाठीच्या कण्यामधील नसांच्या आवरणातून तयार होणारा बेनाइन (विना-कर्करोगजन्य) ट्यूमर असतो. पण, हा ट्यूमर स्पाइनल कॅनलमध्ये असल्याने पाठीच्या कण्यावर दाब टाकत होता आणि त्यामुळे तीव्र न्यूरोलॉजिकल अशक्तपणा निर्माण होत होता. पाठीच्या कण्यातील एवढे मोठे ट्यूमर अत्यंत दुर्मिळ असतात आणि त्यांच्यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजनाची आवश्यकता असते. उपचार केले नसते, तर रुग्णाला कायमचे अपंगत्व येण्याचा, मूत्राशय व आतड्यांवरील नियंत्रण सुटण्याचा आणि चेतातंतूंचे न भरून येणारे नुकसान होण्याचा धोका होता.”
ते पुढे म्हणाले, “ही शस्त्रक्रिया अॅडव्हान्स्ड मायक्रोस्कोपिक स्पाइनल पद्धती आणि हाय-मॅग्निफिकेशन ऑपरेटिंग मायक्रोस्कोपचा (शरीराच्या आतील अत्यंत सूक्ष्म भागांचे किंवा पेशींचे मोठे आणि स्पष्ट चित्र दाखवण्याची क्षमता असलेला सूक्ष्मदर्शक) वापर करून करण्यात आली. यामुळे पाठीचा कणा आणि सभोवतालच्या चेतातंतूंचे रक्षण करताना आम्हाला ट्यूमर सुरक्षितपणे काढून टाकण्यास मदत झाली. रुग्णाने आशादायक सुधारणा दाखवली आहे. शस्त्रक्रियेच्या दोन महिन्यांनंतर, ते स्वतंत्रपणे उभे राहण्यास, वॉकरच्या सहाय्याने चालण्यास सक्षम झाले आणि त्यांनी आधाराशिवाय कमी अंतरावर चालण्यास सुरुवात केली आहे. सतत पुनर्वसनामुळे आम्हाला त्यांच्या हालचालींमध्ये आणि जीवनमानाच्या दर्जात आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.”
मणिपाल हॉस्पिटल खराडीचे हॉस्पिटल डायरेक्टर डॉ. अमित माने म्हणाले, “पाठीच्या कण्यातील गुंतागुंतीच्या ट्यूमरवर उपचार करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान, शस्त्रक्रियेतील कौशल्य आणि विविध वैद्यकीय शाखांच्या समन्वयाने दिली जाणारी केअर आवश्यक असते. हा यशस्वी निकाल जागतिक दर्जाची स्पाइन केअर प्रदान करण्याच्या आणि रुग्णांना त्यांची हालचाल, स्वातंत्र्य व आत्मविश्वास परत मिळवून देण्यास मदत करण्याच्या आमच्या कटिबद्धतेला निदर्शनास आणतो. मणिपाल हॉस्पिटल खराडी येथे, आम्ही उत्कृष्ट निकालांसह आव्हानात्मक केसेस हाताळण्यासाठी प्रगत वैद्यकीय क्षमतांना पाठबळ देणे सुरूच ठेवले आहे.”
सतत होणारी पाठदुखी, बधीरता, पायांमधील अशक्तपणा, चालण्यास त्रास होणे किंवा मूत्राशय आणि आतड्यांच्या सवयींमधील बदल याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. सुरुवातीच्या टप्प्यात केलेले न्यूरोलॉजिकल मूल्यांकन आणि वेळेवर केलेले एमआरआय मज्जातंतूंना कायमस्वरूपी नुकसान होण्यापूर्वी पाठीच्या कण्यातील ट्यूमर शोधण्यात मदत करू शकते. वेळेवर झालेले निदान व उपचार बरे होण्याची शक्यता लक्षणीयरित्या वाढवतात आणि रुग्णांना उत्तम दर्जाचे जीवन पुन्हा जगण्यास मदत करतात.
मज्जातंतूंना कायमस्वरूपी नुकसान होण्यापूर्वी, लवकर केलेली मज्जासंस्थेची तपासणी आणि वेळेवर केलेली एमआरआय तपासणी पाठीच्या कण्यातील गाठी शोधण्यास मदत करू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी