संतांच्या उंचीवर संपूर्ण समाजाने यावे अशी संतांची तळमळपरभणी-मानवत येथील वारकरीभूषण ह.भ.प. उमेश महाराज दशरथे यांचे कीर्तन ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन
पुणे : उंचीवर पोहोचलेला माणूस आपल्या उंचीचे रहस्य सांगत नाही, कारण त्याच्या योग्यतेला कोणी यावे, असे त्यांना वाटत नाही. पण संत जीवन हा एकमेव अपवाद आहे. ज्यांना आपण ज्या उंचीवर आहोत, तिथे संपूर्ण समाजाने यावे, असे वाटते, असे प्रतिपादन परभणी-मानवत येथील वारकरी भूषण ह.भ.प. उमेश महाराज दशरथे यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे चातुर्मासानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते.
ह.भ.प. उमेश महाराज दशरथे म्हणाले, तत्त्वज्ञानामध्ये काय असते? कोणत्याही कर्माचे फळ हे कृती देत नाही; त्याच्याविषयी असणारी आसक्ती ही माणसाच्या फळाला कारणीभूत असते. हे मी केले, असा जो अहंकार हृदयात असतो, तो अहंकार माणसाला दुःख देतो.
श्रीमद् भागवतामध्ये एकादश स्कंधामध्ये एक गीत येते. माणसाला जिथे आसक्ती, ते दुःखाला कारणीभूत. पण आम्ही काय करतो? कर्माची आसक्तीच धरत नाही. उदास वृत्तीने कर्म करतो आणि कर्म आम्हाला लागत नाही, असेही त्यांनी सांगितले.
