-विजयसिंह घाडगे, रणजीत पाटील, देवा चव्हाण यांना यंदाचा शौर्य पुरस्कारलेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) यांची उपस्थिती ; पवन माने, निलेश भोरडे यांचा देखील गौरव ; पुरस्कार वितरण आज (दि.८)
पुणे : सद््रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद प्रत्यक्षात आणत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या संरक्षणार्थ कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे, पोलीस अंमलदार रणजीत पाटील, देवा चव्हाण, पवन माने, पोलीस हवालदार निलेश भोरडे यांना यंदाचा ८ वा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शौर्य पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक ८ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर यांनी दिली.
कार्यक्रमाला लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर, विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा आठवे वर्ष असून समाजात शौर्य गाजवित अचंबित करणारी कामगिरी करणा-या व्यक्तींना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते. पोलीस क्षेत्रात कार्यरत असताना या सर्वांनीच समाज सुरक्षेबाबत देखील अत्यंत जागरुकपणे कार्य केले आहे. पुण्यातील गुन्हेगारीला आळा बसावा, याकरिता शौर्य गाजविणारे हे रिअल लाईफ सिंघम आहेत. त्यामुळे त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना गौरविण्यात येणार आहे.
