शंभरी ओलांडलेल्या स्वातंत्र्यसैनिकाच्या वीरपत्नीचा पुण्यात सन्मान सोहळा
‘माय स्टॅम्प’ या संकल्पनेप्रमाणे छायाचित्र तिकिट प्रदर्शित ; धान्य तुला करून १०१ किलो धान्याचे दान
पुणे : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात कर्नाटकमधून सहभाग घेणाऱ्या आणि कालांतराने पुण्यात वास्तव्यास असलेले स्वातंत्र्यसैनिक विश्वनाथ गुप्ते यांच्या वीरपत्नी शामला गुप्ते यांनी नुकतीच वयाची शंभरी पूर्ण केली. शंभरी ओलांडलेल्या स्वातंत्र्यसैनिकाच्या वीरपत्नीचा हा सन्मान विधायक पुणे या गणेशोत्सव मंडळाच्या व्यासपीठातर्फे करण्यात आला. विशेष म्हणजे पुणे सिटी पोस्ट च्या ‘माय स्टॅम्प’ या संकल्पनेप्रमाणे शामला गुप्ते यांचे छायाचित्र तिकिट प्रदर्शित करून त्यांच्या कार्याचा गौरव टपाल खात्याने केला.
विधायक पुणे आणि गुप्ते परिवार यांच्या वतीने शामला गुप्ते यांच्या ‘शंभरी’ चा कार्यक्रम आपटे रस्त्यावरील श्रेयस हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुणे सिटी पोस्टाचे सिनियर पोस्ट मास्तर विलास घुले, सुरेंद्र तापकीर, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, विष्णू ठाकूर, मिलिंद गुप्ते, मोनिका गुप्ते यांसह गुप्ते परिवार आणि विविध गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
त्याकाळी स.प. महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या आणि आज १०१ व्या वर्षी तब्बल चार पिढ्या पाहिलेल्या शामला गुप्ते यांचा सन्मान गणेशोत्सव मंडळांनी देखील केला. सन १९७२ च्या दुष्काळात रेशनवर धान्य आणून केलेला संसार आणि जुने पुणे पाहिलेल्या शामला गुप्ते यांनी उपस्थितांना आशीर्वाद देत निरोगी आरोग्याचा मंत्र देखील दिला. यावेळी त्यांची धान्यातुला करण्यात आली. हे १०१ किलो धान्य आपलं घर या संस्थेला देण्यात आले.
- फोटो ओळ : विधायक पुणे आणि गुप्ते परिवार यांच्या वतीने स्वातंत्रसैनिक विश्वनाथ गुप्ते यांच्या वीरपत्नी शामला गुप्ते यांच्या ‘शंभरी’ चा कार्यक्रम आपटे रस्त्यावरील श्रेयस हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांची धान्य तुला करण्यात आली. तसेच पुणे सिटी पोस्ट च्या ‘माय स्टॅम्प’ या संकल्पनेप्रमाणे शामला गुप्ते यांचे छायाचित्र तिकिट प्रदर्शित करून त्यांच्या कार्याचा गौरव टपाल खात्याने केला.
