August 5, 2026

वारकरी संप्रदायामध्ये शब्दाच्या सेवेला आणि शब्दसाधनेला महत्त्वज्ञानेश्वरी कंठभूषण ह.भ.प.ओंकार महाराज दुडे शास्त्री यांचे कीर्तन ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन

0
IMG-20260804-WA0052
Spread the love


पुणे : वारकरी संप्रदायामध्ये शब्दाच्या सेवेला आणि शब्दसाधनेला खूप महत्त्व आहे. साधकाच्या जीवनामध्ये परमेश्वराला जेवढे महत्त्व नसते, तेवढे शब्दाला महत्त्व असते. नव्हे तर साधकाच्या जीवनामध्ये शब्द हाच परमेश्वर असतो. जगामध्ये अनेक ग्रंथ आहेत, अनेक पुस्तके आहेत. पण प्रत्येक ग्रंथ हा पूजेसाठी वापरला जात नाही किंवा प्रत्येक ग्रंथ उपासनेसाठी वापरला जात नाही, पण वारकरी संतांनी निर्माण केलेले वाङ्मय हे अभ्यासाचे आणि उपासनेचे सुद्धा आहे, असे प्रतिपादन आळंदी येथील ज्ञानेश्वरी कंठभूषण ह.भ.प.ओंकार महाराज दुडे शास्त्री यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जंगली महाराज रस्त्याजवळील हॉटेल सेंट्रल पार्क येथे चातुर्मासानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ९ आॅगस्ट पर्यंत हा महोत्सव सुरु असून दररोज सायंकाळी ५.३० वाजता महाराष्ट्राच्या विविध भागांतील नामवंत कीर्तनकारांना ऐकण्याची व यामाध्यमातून स्वरब्रह्माची अनुभूती घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

ओंकार महाराज दुडे शास्त्री म्हणाले, ज्ञानेश्वरी जसा उपासनेचा ग्रंथ आहे, तशी ज्ञानेश्वरी हा अभ्यासाचा ग्रंथ आहे. गाथा जसा उपासनेचा ग्रंथ आहे, तसा गाथा अभ्यासाचा विषय, अभ्यासाचा ग्रंथ आहे. म्हणजे वारकरी संतांनी लिहिलेल्या वाङ्मयाचं विशेषत्व आहे की ते उपासनेमध्येही मोडते आणि अभ्यासामध्येही मोडते.

कीर्तनात पुढे ते म्हणाले. ज्ञानेश्वरी वाचत रहा. वाचत जरी राहिले, काही भावना जरी तयार नाही झाली तरी देखील ती ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचत राहिला, तर तुम्हाला कळीकाळाचे भय राहणार नाही. ज्ञानेश्वरी वाचत असताना आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय आपण शिल्लक नाही ठेवायचा.

सर्वतः ज्ञानेश्वरीवरती अवलंबून, ज्ञानेश्वरीलाच आपला आधार मानून, आपलं संपूर्ण जीवन ज्ञानेश्वरीला अर्पण करून, मनामधले सगळे संशय बाजूला सोडून, ही ज्ञानेश्वरी माझा उद्धार करणार आहे, ही ज्ञानेश्वरी मला भगवंतापर्यंत नेणारी आहे, असा दृढ भाव मनामध्ये धारण करून ती वाचायची, असे संत एकनाथ महाराज सांगतात, असेही त्यांनी सांगितले. महोत्सवाला प्रवेश खुला असून कीर्तनांचा पुणेकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी