August 1, 2026

आधुनिक गुन्हेगारीविरोधात समाजात जनजागृतीची नितांत गरज – विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतिप्रिया सिंग

0
IMG-20260801-WA0038
Spread the love

पुणे : तंत्रज्ञान जितक्या वेगाने विकसित होत आहे, तितक्याच वेगाने गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत आहे. पारंपरिक चोरी, दरोडे यांसारख्या गुन्ह्यांची जागा आता ऑनलाइन फसवणूक, डिजिटल आर्थिक गुन्हे आणि सायबर हल्ल्यांनी घेतली आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी पुरेशी माहिती आणि जागरूकता नसल्याने अशा गुन्ह्यांना खतपाणी मिळत आहे. त्यामुळे केवळ पोलीस यंत्रणाच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाला सायबर सुरक्षेबाबत जागरूक करणे आवश्यक असून, ”इन्व्हेस्टिगेशन मास्टरक्लास” सारख्या प्रशिक्षण कार्यशाळा देशभरात आयोजित होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्योतिप्रिया सिंग, IPS, विशेष पोलीस महानिरीक्षक (Spl. IGP), अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स (ANTF), महाराष्ट्र यांनी केले.
ट्रान्सेंडेंटल टेक्नॉलॉजीज आणि तंत्रज्ञान विभाग – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने, व पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने पुणे विद्यापीठाच्या जिऑलॉजी विभागात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय ‘इन्व्हेस्टिगेशन मास्टरक्लास’ प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. आगामी काळात अशा कार्यशाळांचे राष्ट्रीय स्तरावर विविध शहरांमध्ये आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
यावेळी श्रीकांत पाठक, IPS, विशेष पोलीस महानिरीक्षक (Spl. IGP), आर्थिक गुन्हे शाखा (EOW), गुन्हे अन्वेषण विभाग (CID), पुणे, अरविंद साळवे, IPS, पोलीस उपमहानिरीक्षक (DIG), दहशतवादविरोधी पथक (ATS), महाराष्ट्र राज्य, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. अरुण दातार, संजय शर्मा, द्वितीय कमांडंट, सीमा सुरक्षा बल (BSF)गृह मंत्रालय, भारत सरकार, ट्रान्सेंडेंटल टेक्नॉलॉजीजचे प्रमुख डॉ. केतन अत्रे यांच्यासह विविध पोलीस अधिकारी, सरकारी विभागांचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात ज्योतिप्रिया सिंग म्हणाल्या, “सायबर गुन्हे केवळ आर्थिक नुकसान करत नाहीत, तर पीडित व्यक्तीला मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागते. अनेक वेळा त्याचे गंभीर परिणाम होऊन व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होते. सायबर गुन्ह्यांमध्ये माणसाचे संपूर्ण आयुष्य विस्कळीत करण्याची क्षमता आहे. त्यामुळे वेळेत जनजागृती आणि योग्य प्रशिक्षण हेच या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याचे सर्वोत्तम साधन आहे.”
श्रीकांत पाठक म्हणाले, “गेल्या काही वर्षांत गुन्हेगारांनी गुन्हे करण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलल्या आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि सायबर गुन्हे केले जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी पुरेशी माहिती नसणे हे पोलीस यंत्रणेसमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळे पोलिसांसोबतच नागरिकांनीही अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे.”
अरविंद साळवे यांनी सांगितले की, “दहशतवादी कारवायांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा आणि डिजिटल तपास याबाबतचे प्रशिक्षण दहशतवादविरोधी पथकासाठीही अत्यंत महत्त्वाचे असून, त्याचा राष्ट्रीय सुरक्षेसाठी निश्चितच फायदा होईल.”
संजय शर्मा म्हणाले, “सायबर गुन्ह्यांविषयी समाजात सातत्याने जनजागृती व्हावी यासाठी अशा कार्यशाळा देशातील विविध शहरांमध्ये आयोजित होणे गरजेचे आहे. नागरिक जागरूक झाले तर सायबर गुन्ह्यांचे प्रमाण निश्चितच कमी होऊ शकते.”
प्रास्ताविकात डॉ. केतन अत्रे यांनी सांगितले की, “इन्व्हेस्टिगेशन मास्टरक्लास” हा उपक्रम लवकरच महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्येही राबविण्यात येणार आहे. या कार्यशाळांचा लाभ केवळ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनाच नव्हे, तर सरकारी अधिकारी, कायदा अंमलबजावणी यंत्रणा यांनाही होणार आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमित त्रिभुवन यांनी केले. यावेळी “इन्व्हेस्टिगेशन मास्टरक्लास “ या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मनीषा सोमण यांच्या नृत्य शारदा कथ्थक कला मंदिरच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना सादर केली. तसेच लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त विशेष कथ्थक नृत्याविष्कार सादर करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी