वसुंधरा’ शैक्षणिक लघुपटाचे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे येथे दिमाखदार सादरीकरण
‘
पुणे,
साई मीडिया एंटरटेनमेंट प्रस्तुत, संपत मेमाणे आणि निर्मिती मंदार नामजोशी, निर्मित, भक्ती जाधव लिखित तसेच योगेश जाधव दिग्दर्शित ‘वसुंधरा’ या पर्यावरण जनजागृती करणाऱ्या शैक्षणिक लघुपटाचे विशेष सादरीकरण राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रोड, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
या कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये श्री. नंदकुमार सागर (सचिव, महाराष्ट्र), श्री. शिवाजी कामठे (सचिव, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ), श्री. हनुमंत पवार (वरिष्ठ सहसंपादक, वार्ता) तसेच श्री. आशिष जराड (जिल्हा परिषद) यांचा समावेश होता. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार निर्माते संपत मेमाणे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपुरे यांची उपस्थिती. त्यांनी ‘वसुंधरा’ या लघुपटामध्ये ‘काकाजी’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि प्रेक्षकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
‘वसुंधरा’ हा लघुपट विद्यार्थ्यांना मनोरंजनाच्या माध्यमातून पर्यावरणाबद्दल जागरूक करणारा आहे. वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, ग्लोबल वॉर्मिंग, पाण्याचा योग्य वापर, विजेची बचत, प्रदूषण नियंत्रण आणि निसर्ग संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर अत्यंत सोप्या आणि मुलांना समजेल अशा भाषेत प्रभावी संदेश देण्यात आला आहे. हा लघुपट आता राज्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शित करण्यात येणार असून पर्यावरण शिक्षणासाठी तो एक उपयुक्त शैक्षणिक माध्यम ठरणार आहे.असे मनोगत मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले, तर निर्मिती मंदार नामजोशी यांनी येत्या काळात असे अनेक शैक्षणिक आणि माहितीपर लघुपट निर्माण करणार असल्याचे सांगितले..
या प्रसंगी चित्रपटातील कलाकार मंदार नामजोशी, आनंद जोशी, श्रद्धा साटम तसेच चित्रपटाचे सर्व तंत्रज्ञ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी लघुपटाच्या संकल्पनेचे कौतुक करत हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारा असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी गायकवाड सर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रेक्षकांचे आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली.
