July 27, 2026

आयुर्वेदात निदानाचे महत्व सर्वाधिकआयुर्वेद वाचस्पती ज्येष्ठ नामांकित वैद्य त्रिलोक धोपेश्वरकर ; आयुर्वेदाचार्य वैद्य पराग दाते यांना यशस्वी युवा वैद्य पुरस्कार प्रदान

0
IMG-20260726-WA0035(1)
Spread the love


पुणे : रुग्णाला काय झाले आहे, याबद्दलचे अचूक निदान, युक्ती आणि चिकित्सा या तिन्ही गोष्टी जो नीट जोडू शकतो तो वैद्य यशस्वी होतो. आयुर्वेदात प्रश्न चिकित्सेने रुग्णांकडून अनेक गोष्टी समजू शकतात. ही अतिशय सोपी व प्राथमिक पद्धत आहे. प्रगतीशील वैद्य व्हायचे असेल, तर आयुर्वेदीय निदानाची कास धरायला हवी. तसेच आयुर्वेदीय ग्रंथ प्रमाण मानून वाटचाल करायला हवी, असे मत आयुर्वेद वाचस्पती ज्येष्ठ नामांकित वैद्य त्रिलोक धोपेश्वरकर यांनी व्यक्त केले.

वैद्य लावगनकर परिवारातर्फे आणि लिडजेन आयुर्वेदिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने कै. वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर स्मृतिप्रीत्यर्थ यशस्वी युवा वैद्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पटवर्धन बागेतील धन्वंतरी सभागृहात करण्यात आले होते. यावेळी रत्नागिरीचे आयुर्वेदाचार्य वैद्य पराग दाते यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजक वैद्य लक्ष्मण लावगनकर, वैद्य माधव भागवत आदी उपस्थित होते.

पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा सहावे वर्ष असून सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. वैद्य त्रिलोक धोपेश्वरकर यांनी ‘आयुर्वेदीय निदानाचे महत्व’ या विषयावर यावेळी व्याख्यान दिले.

वैद्य पराग दाते म्हणाले, आयुर्वेद शास्त्राच्या अभ्यासाकडे आपली प्रवृत्ती ठेवली आणि अनुभवातून शिकलो, तर शास्त्र दृष्टीसही वैदयांना चांगले यश मिळेल. प्रथमतः व्याधीचे निदान करता आले, तर पुस्तकात सर्व प्रकारच्या चिकित्सा दिल्या आहेत. त्यामुळे पुढील गोष्टी सोप्या होऊ शकतात. त्याकरिता सुरुवातीला निदान अचूक होणे आवश्यक आहे.

वैद्य लक्ष्मण लावगनकर म्हणाले, आयुर्वेद जितका सोपा करता येईल, तितका समाजात खोलवर रुजविता येईल, अशी कै. वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर यांची धारणा होती. त्यांनी आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आयुष्य झिजविले आणि वैद्य परंपरेत स्वतःचा ठसा उमटवला. स्वतः आयुर्वेदाची दिनचर्या पाळून उत्तमोत्तम वैद्य घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या विचारांचा नंदादीप तेवत ठेवण्यासाठी त्यांच्या पुढच्या पिढीने युवा वैद्य पुरस्काराचे आयोजन केले, असेही त्यांनी सांगितले. पद्मश्री कुलकर्णी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. वैद्य राम भारसाखले यांनी आभार मानले.

  • फोटो ओळ : वैद्य लावगनकर परिवारातर्फे आणि लिडजेन आयुर्वेदिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने कै. वैद्य चंद्रकांत उर्फ नाना लावगनकर स्मृतिप्रीत्यर्थ यशस्वी युवा वैद्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पटवर्धन बागेतील धन्वंतरी सभागृहात करण्यात आले होते. यावेळी (डावीकडून) वैद्य माधव भागवत, वैद्य त्रिलोक धोपेश्वरकर, वैद्य पराग दाते, वैद्य लक्ष्मण लावगनकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी