July 10, 2026

उच्च शिक्षणात वारकरी संप्रदाय समाविष्ट करण्यासाठी सरकारने नवे शैक्षणिक मॉडेल बनवावे

0
IMG-20260710-WA0138
Spread the love

डॉ. राहुल वी. कराड यांचे मत : पालखीचे भव्य स्वागत

पुणे, २ जुलै : “सरकारने असे शैक्षणिक मॉडेल तयार करावे, ज्याद्वारे वारकरी संप्रदायाची परंपरा उच्च शिक्षणामध्ये समाविष्ट करता येईल. यासाठी शिक्षण तज्ज्ञांनी एकत्र येणे गरजेचे आहे. विज्ञान, अध्यात्म आणि वारी यांचा समन्वय साधून सुसंस्कृत नवी पिढी निर्माण करता येईल,” असे मत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांनी व्यक्त केले.

टाळ-मृदुंगाचा अखंड निनाद आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ च्या जयघोषात भक्तिमय वातावरणात पुणे शहरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे भावपूर्ण स्वागत माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने करण्यात आले. यावेळी त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

एमआयटी-डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड आणि विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अदिती राहुल कराड यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले.

यावेळी सौ. उषा विश्वनाथ कराड, एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश तु. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांच्यासह विद्यापीठातील पदाधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माध्यमांशी संवाद साधताना डॉ. राहुल कराड म्हणाले, “नव्या पिढीशी समन्वय साधण्यासाठी ज्ञानेश्वरी आणि गाथेचे सर्व भाषांमध्ये भाषांतर होणे गरजेचे आहे. विज्ञानाच्या युगात विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या ब्रीदवाक्यानुसार ‘विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच विश्वशांती नांदेल.’ हाच धागा पकडून शिक्षणाचा आणि वारकरी संप्रदायाचा उच्च शिक्षणात कसा उपयोग करता येईल, यासाठी वैचारिक मंडळींनी एकत्र येणे आवश्यक आहे.”

यालाच अनुसरून डब्ल्यूपीएचतर्फे ‘वारकरी सम्मेलन’ आयोजित करण्यात आले होते. आता सरकारी स्तरावर यावर विचार करून नवी शैक्षणिक धोरणे आणली जाऊ शकतात, असेही डॉ. कराड यांनी सांगितले.

जनसंपर्क विभाग,
एमआयटी-डब्ल्यूपीएच, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी