आत्मनिर्भर भारतासाठी कौशल्याधिष्ठित शिक्षण गरजेचेसीओईपी भाऊ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ.राजेंद्र हिरेमठ ; जय गणेश विद्यार्थी पालकत्त्व योजना माजी विद्यार्थी मेळावा व विविध ७५ पेक्षा जास्त स्किलिंग कोर्सेसमधील १०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान
पुणे : आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पुस्तकी शिक्षण पुरेसे नाही. ज्ञानाला कौशल्याची जोड मिळाली, तरच आत्मविश्वास, रोजगार आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण होते. म्हणूनच आज कौशल्याधारित शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. भारत २०४७ मध्ये विकसित देश होईल, हे स्वप्न आपण पहात आहोत. मात्र, अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे, ती पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी तरुणाईला कौशल्याधिष्ठित शिक्षण देणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्ट कार्यरत आहे, असे मत सीओईपी भाऊ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश ज्ञानवर्धन अभियान अंतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्त्व योजना माजी विद्यार्थी मेळावा व विविध स्किलिंग कोर्सेस प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन सदाशिव पेठेतील फडके हॉल येथे करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, विजय भालेराव, राजाभाऊ कदम, ज्ञानदीप अकॅडमी चे महेश शिंदे, राजाभाऊ पायमोडे, विलास रासकर, विश्वास पलुसकर आदी उपस्थित होते. यावेळी १०० हून अधिक माजी विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.
ट्रस्टतर्फे सुरु असलेल्या ७५ पेक्षा जास्त स्किलिंग कोर्सेसमधील १०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आरी वर्क, नेल आर्ट, फॅब्रिक पेंटिंग, मेहंदी, ब्युटिशियन यांसारख्या विविध कोर्सचा समावेश आहे. तरुणींना आत्मनिर्भर करण्याकरिता हे कोर्स उपयुक्त असून आत्मनिर्भर भारताकडे पुढचे पाऊल टाकण्याच्या दृष्टीने दगडूशेठ गणपती ट्रस्ट यामाध्यमातून खारीचा वाटा उचलत आहे.
डॉ. राजेंद्र हिरेमठ म्हणाले, आत्मनिर्भर भारत म्हणून आपण स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी विज्ञानावर आधारित संशोधन गरजेचे आहे. अनेक स्टार्ट अप सुरु होणे देखील आवश्यक आहे. सरकार यासाठी मोठे सहाय्य देऊन सोयी-सुविधा पुरवत आहे. आज तरुणाई मोबाईलच्या विळख्यात अडकत चालली आहे. त्यातून बाहेर पडून चांगला वेळ कसा देता येईल, हे पाहायला हवे.
महेश सूर्यवंशी म्हणाले, सन २०१० पासून पालकत्व योजना सुरु असून तब्बल ६० हून अधिक शाळांचा यामध्ये समावेश आहे. आता कौशल्य वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत चांगले व्यक्तिमत्व घडावे, हा ट्रस्टचा प्रयत्न आहे. समाजात मानसिक विकृती वाढत असून त्यामुळे आजच्या पिढीत चांगले संस्कार व मूल्य रुजविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज योजनेतून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी चांगल्या पदावर कार्यरत आहेत. कोर्सेसच्या माध्यमातून केवळ तांत्रिक प्रशिक्षण दिले जात नाही, तर व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुणही विकसित केले जात आहेत.
माजी विद्यार्थीनी साक्षी दगडे म्हणाली, मी इयत्ता ५ वी मध्ये असताना योजनेत आले होते. तेव्हा नुकतीच ही योजना सुरु झाली. कोणाशीही बोलायला मी घाबरत होते. पण आज मी माझे विचार स्वतंत्रपणे मांडू शकते. ट्रस्टच्या माध्यमातून माझा सर्वांगीण विकास झाला असून माझ्यासारख्या अनेकांच्या पंखाना बळ मिळाले आहे. आम्ही देखील भविष्यात असेच समाजासाठी कार्य करू, असेही तिने सांगितले. विद्या अंबर्डेकर आणि अंकिता शिळीमकर यांनी सूत्रसंचालन केले.
