June 18, 2026

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरा

0
IMG-20260617-WA0060
Spread the love

वृद्धाश्रम आणि वंध्यत्वाच्या वाढत्या समस्यांवर उपाययोजनांचा ना. पाटील यांचा संकल्प

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड मधील सखी-सुखदा वूमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने आयोजित आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना वृद्धाश्रम आणि वंध्यत्वाच्या वाढत्या समस्यांवर उपाययोजना करण्यासंदर्भात ना. पाटील संकल्प व्यक्त केला.

सखी-सुखदा वेल्फेअर फाऊंडेशनच्या माध्यमातून वस्ती भागातील ९०० गरोदर मातांना सुरक्षित प्रसूतीसाठी सहाय्य करण्यात आले. यानिमित्ताने फाऊंडेशनच्या वतीने आनंदोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने १८०० बालकांचे आधारकार्ड आणि सुकन्या समृद्धी योजनेचे कार्ड वितरित करण्यात आले. त्यासोबतच पाच चिमुकल्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून विशेष बक्षीस देण्यात आले.

या कार्यक्रमाला सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या संचालिका स्मीता पाटील, ॲड. तनिषा पाटील, उद्योजक ललीत कुमार जैन, झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे सीईओ सतिश खडके, फाऊंडेशनच्या सुरेखा जगताप, धनश्री चितळे यांच्यासह सखी-सुखदा वुमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या सर्व सदस्या आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ना. पाटील म्हणाले की, स्मीता पाटील यांच्या खंबीर नेतृत्वामुळे सखी-सुखदा हा प्रकल्प यशस्वी झाला असून; सखी-सुखदाच्या वतीने आयोजित आनंद मेळावा म्हणजे आनंदी कोथरुडच्या वचनपूर्तीतील एक भावनिक क्षण आहे. या उपक्रमांतर्गत वस्ती भागातील अनेक गरोदर मातांचे बाळंतपण करण्याची संधी मिळाली.

ते पुढे म्हणाले की, सध्या समाजात वृद्धाश्रमांची वाढती संख्या आणि वंध्यत्वाची समस्या ही गंभीर सामाजिक चिंता बनली आहे. त्यामुळे वृद्धाश्रमासारख्या संकल्पना मोडीत काढण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन, एखाद्या वयोवृद्ध दाम्पत्य किंवा एकल महिलांचे पालकत्व स्विकारावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

वंध्यत्व हा देखील चिंतेचा विषय झाला असून कोल्हापूर मधील हितैषी प्रमाणे, वंध्यत्व निवारणासाठी समुपदेशन आणि दत्तक प्रक्रिया आणि फॉस्टर केअर प्रक्रियेसाठी सखी-सुखदा अंतर्गत नवीन सेंटर कार्यान्वित करण्याचे यावेळी त्यांनी घोषित केले. तसेच, आगामी काळात सखी-सुखदा उपक्रमामधून नवजात बालकांची श्रवण क्षमता तपासण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी घोषित केले.

कार्यक्रमाला उपस्थित उद्योजक ललीत जैन आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सतीश फडके यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सखी-सुखदा वूमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या स्मीता पाटील यांनी केले.

चौकट

सखी-सुखदाला कायमस्वरूपी कार्यालयाची भेट

सखी-सुखदा वूमन वेल्फेअर फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याची दखल घेत उद्योजक ललीत जैन यांनी संस्थेला कार्यालयासाठीची जागा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे संस्थेच्या आगामी उपक्रमांना मोठे बळ मिळणार असून; सखी-सुखदाच्या कार्याला अधिक स्थैर्य प्राप्त होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी