June 16, 2026

विद्यापीठे, उद्योग आणि संशोधन संस्थांमध्ये भागीदारीची गरज

0
IMG-20260606-WA0048
Spread the love
  • राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे प्रतिपादन; हिंदू इकॉनॉमिक फोरम आयोजित ‘शक्ती समिट २०२६’चा समारोप

पुणे: “उच्च आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता असून, केवळ पदवीधर नव्हे, तर भावी संशोधक, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते घडविण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांवर आहे. यासाठी विद्यापीठे, उद्योग आणि विविध आर्थिक मंचांमध्ये सखोल सहकार्य आणि भागीदारीची गरज आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.

हिंदू इकॉनॉमिक फोरम (एचईएफ) पुणे डिस्ट्रिक्ट चॅप्टरच्या वतीने आयोजित पहिल्या ‘शक्ती समिट २०२६’, उद्योजकता परिषदेचा समारोप राज्यपाल वर्मा यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. पाषाण येथील पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमावेळी लेफ्ट. जनरल (निवृत्त) अजयकुमार सिंग, क्विन्टेसेंशियल फ्रॅग्रन्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष भरत कामठे, ॲक्युरेट ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक किरण जाधव, हिंदू इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष गौरव त्रिपाठी, संकेत खरपुडे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशनच्या नियामक मंडळाचे सदस्य दीपक करंजीकर, भारत फोर्जचे राजेंद्रसिंग भाटिया यांच्या हस्ते समिटचे उद्घाटन झाले.

‘शक्ती समिट’चे कौतुक करीत जिष्णू देव वर्मा म्हणाले, “हे व्यासपीठ उद्योजक, गुंतवणूकदार, संशोधक, स्टार्टअप, लघुउद्योग, धोरणकर्ते आणि विचारवंत यांना एकत्र आणून भारताच्या आर्थिक आणि धोरणात्मक विकासासाठी दिशा देणारे आहे. ‘धोरणात्मक क्षेत्रांतील संधी’ ही नवीन भारताच्या आकांक्षांचे प्रतीक आहे. आत्मविश्वासू, आत्मनिर्भर, तंत्रज्ञानसंपन्न आणि सांस्कृतिक मूल्यांशी जोडलेला भारत उभारण्यासाठी ज्ञान, नावीन्य, संघटनशक्ती, उद्यमशीलता आणि शिस्त यांचे सामर्थ्य राष्ट्रीय हिताशी जोडणे आवश्यक आहे. जगभरात सुरू असलेले संघर्ष, बदलणारे भू-राजकीय समीकरण आणि जागतिक पुरवठा साखळीतील बदल यामुळे भारतासमोर मोठ्या संधी निर्माण होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण, अवकाश, रोबोटिक्स, प्रगत उत्पादन, ऊर्जा, आरोग्य आणि डिजिटल अर्थव्यवस्था ही आता केवळ उदयोन्मुख क्षेत्रे नसून राष्ट्रीय सामर्थ्याची प्रमुख आधारस्तंभ ठरत आहे.”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीचे स्मरण करत राज्यपाल वर्मा म्हणाले, “भारताने आत्मनिर्भरता, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि धोरणात्मक सामर्थ्याच्या बळावर विकसित राष्ट्र बनण्याचा संकल्प अधिक दृढ करावा. शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य उभे केले, त्याच धर्तीवर आजच्या भारताने नवसंशोधन, उद्योग आणि राष्ट्रीय बांधिलकीच्या बळावर जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करावी. संत, समाजसुधारक, योद्धे, उद्योगपती, शास्त्रज्ञ आणि विचारवंतांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राने देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ज्ञान, शिक्षण, संस्कृती, आयटी, ऑटोमोबाईल उद्योग, संरक्षण आस्थापना, संशोधन संस्था आणि औषधनिर्माण क्षेत्रातील मजबूत पायाभूत सुविधांमुळे पुणे हे धोरणात्मक उद्योगांचे राष्ट्रीय केंद्र बनण्याची क्षमता आहे.”

“२०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या भारताच्या ध्येयामध्ये केवळ आर्थिक प्रगती नसून समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण केंद्रस्थानी असले पाहिजे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती, महिला आणि युवक यांना विकास प्रक्रियेत समान संधी मिळाल्याशिवाय विकसित भारताची संकल्पना पूर्ण होणार नाही. पूर्वी धोरणात्मक क्षेत्रे केवळ मोठ्या उद्योगसमूहांची मक्तेदारी मानली जात होती. मात्र आता छोट्या उत्पादन युनिट्सना संरक्षण क्षेत्राच्या पुरवठा साखळीत सहभागी होण्याची, इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांना धोरणात्मक हार्डवेअर विकसित करण्याची आणि स्टार्टअपना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाययोजना तयार करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे,” असल्याचे त्यांनी नमूद केले.

अजयकुमार सिंग म्हणाले, “भांडवल देणारे, उद्योजक, स्टार्टअप्स आणि नवकल्पना असलेले युवक-युवती यांना एकत्र आणणारे हे समिट होते. भारताचा विकास झाला, तर जगाचाही विकास होतो, हे भारताने करोन काळात सिद्ध केले आहे. युद्धाचे स्वरूप बदलले असून त्यात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे नागरी-लष्करी संयोग वाढविणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर हे समिट महत्त्वाचे ठरले आहे. स्टार्टअप्समधून नवकल्पना पुढे येऊन त्यांना इन्क्युबेट करण्याचे काम यांसारख्या समिटमधून होईल.”

किरण जाधव म्हणाले, “केंद्र सरकारच्या नव्या संरक्षण खरेदी धोरणामुळे ‘एमएसएमई’ला मोठा फायदा होत आहे. लष्करातील निवृत्त अधिकारी आणि युवावर्ग यांच्या योग्य समन्वयातून आपल्याला अनेक समस्यांवर भारतीय उपाय देणे शक्य आहे. त्याचा प्रत्यय या समिटमध्ये आला.” भरत कामठे यांनीही आपले विचार मांडले. गौरव त्रिपाठी यांनी स्वागत प्रास्ताविक केले, तसेच समारोपावेळी आभार मानले. शुभम कातंगळे यांनी सूत्रसंचालन केले.

संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, विकासावर मंथन
परिषदेमध्ये दिवसभरात संरक्षण व अंतराळ क्षेत्रावरील सत्रात ‘रेअर अर्थ’चे भू-राजकीय महत्त्व, संरक्षण क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि बदलते युद्धतंत्र, ‘विकसित भारत’ मोहिमेत संरक्षण व अंतराळ क्षेत्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची भूमिका, रेल्वे व पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एकात्मिक तंत्रज्ञान, डिजिटल परिवर्तन, एआय आणि इंटरनेट ऑफ थिंग्जच्या बदलते परिदृश्य, हिंदू मंदिरांचे अर्थकारण, ‘ज्ञान, माध्यम आणि कथानक शक्ती’, ‘एआय इन एज्युकेशन, जर्नालिझम अँड गव्हर्नन्स’, शिक्षण, पत्रकारिता आणि प्रशासन क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर, शहरी विकास, औद्योगिक पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स, विकास मार्गिका आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन आदी विषयांवरचर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी