June 16, 2026

विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या कौशल्य शिक्षण चळवळीचा दोन दशकांचा प्रवास उलगडणार

0
IMG-20260606-WA0050
Spread the love
  • ‘लेंड अ हॅण्ड इंडिया’तर्फे पुण्यात मंगळवारी (ता. ९) विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन; सुनंदा माने, राज गिल्डा यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे : विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान न देता त्यांच्यात कौशल्ये, आत्मविश्वास आणि करिअरविषयक स्पष्टता निर्माण करण्यासाठी गेली दोन दशके कार्यरत असलेल्या ‘लेंड अ हॅण्ड इंडिया’ (लाही) या संस्थेच्या कार्याचा गौरव सोहळा मंगळवारी (ता. ९) सायंकाळी ५.३० वाजता पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. या गौरव सोहळ्यास महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम आणि उद्योजक प्रतापराव पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमातून संस्थेच्या २० वर्षांच्या कौशल्य शिक्षण चळवळीचा प्रवास आणि त्याचा लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर झालेला परिणाम उलगडला जाणार असल्याची माहिती संस्थेच्या संस्थापक सुनंदा माने आणि राज गिल्डा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मिलिंद माने म्हणाले, “सन २००६ मध्ये महाराष्ट्रातील अवघ्या १०० शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेली ही चळवळ आज देशातील २० हून अधिक राज्य सरकारे, शिक्षण मंडळे आणि शिक्षण विभागांपर्यंत पोहोचली आहे. शालेय शिक्षण आणि उपजीविकेच्या संधी यांतील दरी कमी करण्यासाठी कौशल्य शिक्षणाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ‘लाही’ने केले आहे. आज संस्थेच्या माध्यमातून हजारो शाळांमधील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत कौशल्य शिक्षण पोहोचत आहे. पारंपरिक शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते; मात्र प्रत्यक्ष जीवनात त्याचा उपयोग कसा करायचा, हे शिकण्याची संधी मर्यादित असते. ‘लर्निंग बाय डुईंग’ अर्थात ‘करून शिकणे’ या संकल्पनेवर आधारित कौशल्य शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, समस्या सोडविण्याची क्षमता, संवाद कौशल्ये आणि आत्मविश्वास विकसित करते. त्यामुळे शिक्षण अधिक अर्थपूर्ण आणि जीवनाभिमुख बनते.”

राज गिल्डा म्हणाले, ‘‘लेंड अ हॅण्ड इंडियाने विकसित केलेला ‘मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स’ हा विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, ऊर्जा व पर्यावरण, शेती, आरोग्य, सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्रांतील मूलभूत कौशल्यांचा परिचय करून देतो. विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, करिअर मार्गदर्शन आणि रोजगारक्षम कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना भविष्यातील करिअरसाठी सक्षम केले जाते. कौशल्य शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दलची आवड वाढते, शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होते आणि करिअर निवडीबाबत स्पष्टता निर्माण होते.’’

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये इयत्ता सहावीपासून कौशल्य शिक्षणावर भर देण्यात आला आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीत ‘लाही’ विविध राज्य सरकारांची ज्ञानसहभागी संस्था म्हणून काम करत असून शाळांमध्ये कौशल्य प्रयोगशाळा उभारणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणे, अभ्यासक्रम विकसित करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे यासाठी योगदान देत आहे.

दोन दशकांच्या या प्रवासात ‘लेंड अ हॅण्ड इंडिया’ने शिक्षणाला रोजगार, उद्योजकता आणि जीवनकौशल्यांची जोड देत विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या कार्याचा गौरव आणि भविष्यातील कौशल्य शिक्षणाच्या दिशेवर चिंतन करण्यासाठी हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी