अक्षरांमधून लेखकांचा वाचकांशी संवादप्रख्यात लेखिका व विचारवंत डॉ. वर्षा तोडमल ; ज्येष्ठ शिक्षिका डॉ.पुष्पा लिमये लिखित ‘विविधा’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : आताच्या काळात सर्व प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मात्र, पूर्वीच्या काळी संदर्भ ग्रंथ मिळवून अभ्यास करणे आणि त्याआधारे साहित्य निर्मिती करणे हे कठीण होते. तरी देखील त्या काळातही अनेक लेखक व शिक्षिकांनी अभ्यास करून पुस्तके लिहिली. लेखक हे अक्षरांमधून वाचकांशी संवाद साधत असत, असे मत प्रख्यात लेखिका व विचारवंत डॉ. वर्षा तोडमल यांनी व्यक्त केले.
सदाशिव पेठेतील श्री गोपाळ हायस्कूलच्या माजी प्राचार्या डॉ.पुष्पा लिमये लिखित ‘विविधा’ पुस्तकाचे प्रकाशन सारसबागेजवळील वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी ज्येष्ठ संपादक डॉ. आनंद हर्डीकर, लेखिका डॉ.पुष्पा लिमये व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. धर्मेंद्र शाह, खाजा शेख यांसह माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात सहभाग घेतला.
डॉ. वर्षा तोडमल म्हणाल्या, साहित्य, संस्कृती, इतिहास, आत्मचरित्र असा बहुरंगी भाग या पुस्तकात वाचनास मिळतो. साहित्याच्या अनेक आशयधारा यानिमित्ताने एकाच पुस्तकात आल्या आहेत. प्रत्येक लेख हा चिंतनाचा नवा सेतू असून मराठी लेखन परंपरेचे समृद्ध चिंतन डॉ.पुष्पा लिमये यामाध्यमातून केले आहे.
डॉ. आनंद हर्डीकर म्हणाले, विविध लेखनप्रकारांचे संकलन या पुस्तकात पाहायला मिळते. लेखनकलेच्या प्रतिभेचे दर्शन देणारी ही साहित्यनिर्मिती असून डॉ.लिमये यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे दर्शन वाचकांना घडत आहे.
डॉ.पुष्पा लिमये म्हणाल्या, विविधा या पुस्तकातील लेख ३० ते ३५ वर्षांपूर्वीचे किंवा त्याही पेक्षा आधीचे आहे. अनेक मासिके व नियतकालिके यामधून हे प्रसिद्ध झाले आहेत. त्यावेळेची परिस्थिती, अवतीभवतीच्या वातावरण, काही प्रसंग, प्रासंगिक प्रश्न, बातम्या याबद्दलच्या प्रतिक्रिया लेखातून उमटल्या आहेत. अशा लेखनापैकी प्रातिनिधीक लेखन हे विविधा त अवतरले असल्याचे त्यांनी सांगितले. विनया देव यांनी सूत्रसंचालन केले. तारा गोपिनाथ यांनी आभार मानले.
- फोटो ओळ : सदाशिव पेठेतील श्री गोपाळ हायस्कूलच्या माजी प्राचार्या डॉ.पुष्पा लिमये लिखित ‘विविधा’ पुस्तकाचे प्रकाशन सारसबागेजवळील वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी (डावीकडून) डॉ. आनंद हर्डीकर, लेखिका डॉ.पुष्पा लिमये, डॉ. वर्षा तोडमल.
