-श्वास संपण्याआधी इच्छा संपतात ; तीच खरी ‘मुक्ती’प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने श्री गणेश गीतेतील ‘भक्तीयोगा’ वर प्रवचनमालेचा दुसरा दिवस
पुणे : माणूस जन्माला येतो तेव्हा श्वास आणि इच्छा दोन्ही घेऊन येतो. जोपर्यंत श्वास चालू असतो, तोपर्यंत इच्छा देखील अखंड चालू असतात. एकतर श्वासाचे भांडे आधी संपते किंवा इच्छांचे भांडे आधी संपते. श्वास संपण्याआधी इच्छा संपल्या, तर त्याला ‘मुक्ती’ असे म्हणतात. असा जो असतो, त्याला ‘जीवनमुक्त’ म्हणतात, असे प्रतिपादन प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित प्रवचनमालेत यवतमाळ वणी येथील प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी श्री गणेश गीतेतील भक्तीयोगावर दुसऱ्या दिवशी निरूपण केले. श्रीमंत थोरले बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात ही प्रवचनमाला सुरु आहे. अधिकमासाच्या पावन मुहूर्तावर भगवान श्री गणेशांच्या भक्तीचा मार्ग प्रशस्त करणारा श्री गणेश गीतेतील भक्तीयोग गणेशभक्तांसमोर मांडण्याकरीता प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज म्हणाले, ज्याला मनावर नियंत्रण ठेवता येते, त्याचेच खरे कौतुक असते. कोणत्याही वाईट गोष्टींना ‘हो’ म्हणण्यासाठी जितकी ताकद लागत नाही, त्यापेक्षा अधिक ताकद ‘नाही’ म्हणण्यासाठी लागते. दोष न करण्यासाठीही सामर्थ्य लागते. मनाला जिंकणे अत्यंत कठीण आहे; पण त्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
ते पुढे म्हणाले, जो माझ्याजवळ येतो त्याच्याजवळ मी आदराने जातो, असे मोरया सांगतात. पण आपण मोरयाला बहुतेक वेळा फक्त दुःखातच आठवतो. समस्या आली की मोरया आठवतो; परंतु सुखातही मोरयाची आठवण ठेवली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
दि. २३ मे २०२६ पर्यंत दररोज सायंकाळी ६.३० ते ८ यावेळेत ही प्रवचनमाला होणार आहे. भगवंताच्या भक्तीचे नेमके स्वरूप काय? भगवान कशाला भक्ती म्हणतात? याचे सविस्तर विश्लेषण मांडण्याकरिता आणि अधिकमासाच्या पावन मुहूर्तावर भगवान श्री गणेशांच्या भक्तीचा मार्ग प्रशस्त करणारा श्री गणेश गीतेतील भक्तीयोग गणेशभक्तांसमोर मांडण्याकरीता प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
