-‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे मोफत महाआरोग्य शिबीर शनिवारी (दि.२३)श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आयोजन ; पुणे जिल्ह्यातील ९० रुग्णालये व संस्थांचा सहभाग
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारून जय गणेश रुग्णसेवा अभियान अंतर्गत मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन शनिवार, दि. २३ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ यावेळेत करण्यात आले आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात हे शिबीर होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.
शिबीरात ह्रदय आजार, किडनी, नेत्र आजार, दंत उपचार, स्त्री रोग, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, अपंगांना मोफत जयपूर फूट वाटप, रक्त तपासणी, रक्तदान शिबीर, ईएनटी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, अस्थिरोग, विविध थेरपी, रेडिओलॉजी, श्रवण आणि स्पीच थेरपी उपचार विनामूल्य करून देण्यात येणार आहे. नागरिकांसाठी वाहने पार्किंग व्यवस्था नू.म.वि. प्राथमिक शाळा, प्रभात थिएटर समोर, अप्पा बळवंत चौक येथे करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील ९० रुग्णालये व संस्थांचा शिबीरात सहभाग आहे. यावेळी फिरता दवाखाना उपक्रमाचे उद्घाटनही होणार आहे.
सुनील रासने म्हणाले, महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व पुणे महानगरपालिकेच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, हे अनेक रुग्णांना माहीत नसते. त्या रुग्णांना ट्रस्टतर्फे योजनांचा लाभ करून दिला जातो. तसेच, ज्या रुग्णांकडे अपुरी कागदपत्रे असतील, त्यांना नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून कागदपत्रे मिळवून देण्याकरिता देखील ट्रस्ट सदैव तत्परतेने कार्य करीत आहे. ‘आरोग्य गणेशा’ अंतर्गत मागील दोन वर्षांमध्ये विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, तपासण्या, साहित्य व औषधे वाटप अशी विविध प्रकारची सर्वतोपरी मदत हजारो रुग्णांना करण्यात आली आहे. तरी रुग्णांनी या मोफत महाआरोग्य शिबीराचा देखील लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
- तब्बल १४ रुग्णवाहिकांच्या माध्यमातून अखंडीतपणे विनामूल्य सेवा
ट्रस्टच्या एकूण १४ रुग्णवाहिका असून अखंडपणे २४ तास पुणे शहर पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात विनामूल्य सेवा दिली जाते. तसेच महाराष्ट्रात डिझेल खर्चात सेवा दिली जात आहे. यामध्ये कान, डोळे, दंत तपासणी व्हॅन रुग्णवाहिकेचा देखील समावेश आहे. याचा लाभ देखील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
