मंदिरांचे समाज कार्य हाच खरा कर्मयोगप.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने श्री गणेश गीतेतील ‘भक्तीयोगा’वर प्रवचनमालेचे उद्घाटन
पुणे : मंदिरे ही समाजाने निर्माण केलेली वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. ती कोणत्या एका व्यक्तीची किंवा चार-पाच विश्वस्तांची नसते. अनेक कुटुंबांचे जीवन मंदिराच्या आधारावर चालत असते. मंदिर हे अर्थकारणाचे एक महत्त्वाचे केंद्र असते. त्यामुळे मंदिरात पैसा आला पाहिजे, कारण तो समाजोपयोगी वापरला जातो. त्यातून मंदिरे समाजात सकारात्मक कार्य करतात, हाच खरा कर्मयोग आहे. कर्माला मोरयाशी जोडलेले आहे, असे प्रतिपादन प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित प्रवचनमालेत यवतमाळ वणी येथील प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज हे श्री गणेश गीतेतील भक्तीयोगावर निरूपण केले. श्रीमंत थोरले बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित प्रवचनमालेचे उद्घाटन झाले. दीपप्रज्वलन प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने उपस्थित होते.
स्वानंद पुंड शास्त्री महाराज म्हणाले, गरजू व्यक्तींची सेवा हीच मोरयाची सेवा आहे. ‘जनसेवा हीच ईशसेवा’ हा अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे आणि मंदिरे यासाठीच समाजात विशेष महत्त्वाची ठरतात. कर्माला नेहमी प्राधान्य असले पाहिजे. जो योग करणारा असूनही अक्रिय राहतो, त्याचा योग अपूर्ण ठरतो. भगवंताला कर्म करणारा प्रिय असतो आणि भगवंताला आवडणारे कर्म करणारा अधिक प्रिय असतो.
ते पुढे म्हणाले, भिंतींच्या काचा हलतील इतक्या मोठ्या आवाजात डीजे लावून जी भक्ती केली जाते, तिला खरी भक्ती म्हणता येत नाही. वाद्यांचा गजर असावा, पण तो मंगल आणि सात्त्विक स्वरूपाचा असावा. सुख, शांती आणि समाधान मिळवायचे असेल तर मोरयाच्या चरणाशी यावे लागते. व्यवहारातही सुख असते, पण ते टिकाऊ नसते. व्यवहारातील सुख तात्पुरते असते. तुमच्या मनात कोणाबद्दलही मत्सर निर्माण झाला, तर समजावे की आपण अधःपतनाच्या खालच्या पातळीवर पोहोचत आहोत.
सुनील रासने म्हणाले, दि. २३ मे २०२६ पर्यंत दररोज सायंकाळी ६.३० ते ८ यावेळेत ही प्रवचनमाला होणार आहे. भगवंताच्या भक्तीचे नेमके स्वरूप काय? भगवान कशाला भक्ती म्हणतात? याचे सविस्तर विश्लेषण मांडण्याकरिता आणि अधिकमासाच्या पावन मुहूर्तावर भगवान श्री गणेशांच्या भक्तीचा मार्ग प्रशस्त करणारा श्री गणेश गीतेतील भक्तीयोग गणेशभक्तांसमोर मांडण्याकरीता प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
