May 16, 2026

पुण्यात रंगणार सहावा सुपरहिट ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’!

0
IMG-20260516-WA0007
Spread the love

मराठी चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण कथा, नव्या विचारांची मांडणी आणि सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करणारा लोकप्रिय मराठी फिल्म फेस्टिव्हल यंदा पुन्हा एकदा पुण्यात रंगणार आहे. रेड एफएम आयोजित या महोत्सवाचे ६वे पर्व २२ ते २४ मे २०२६ दरम्यान पार पडणार असून, मराठी सिनेमाविश्वातील अनेक मान्यवर कलाकार, दिग्दर्शक आणि सिनेरसिक या सोहळ्याला उपस्थित राहाणार आहेत. हा महोत्सव पुण्यातील ई-स्क्वेअर, शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आला असून, प्रेक्षकांसाठी विनामूल्य खुला असणार आहे.

गेल्या पाच पर्वांमध्ये या फिल्म फेस्टिव्हलने महाराष्ट्रातील चित्रपटप्रेमींमध्ये विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठी सिनेमाचा समृद्ध वारसा, बदलत्या काळातील कथा आणि प्रादेशिक कथनशैलीतील नव्या प्रयोगांना व्यासपीठ देणारा हा महोत्सव आता राज्यातील महत्त्वाच्या सिनेमोत्सवांपैकी एक मानला जातो.

यंदाच्या महोत्सवात समकालीन चित्रपटांसोबतच काही अजरामर क्लासिक चित्रपटांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये ‘जैत रे जैत’, ‘तिघी’, ‘गोंधळ’ आणि ‘दशावतार’ या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय विविध पॅनल डिस्कशन्स, दिग्दर्शक आणि कलाकारांशी संवाद तसेच प्रादेशिक कथाकथनाच्या बदलत्या प्रवाहांवर विशेष चर्चासत्रेही आयोजित करण्यात येणार आहेत.

या सोहळ्यात महेश मांजरेकर, अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी, शिवराज वायचळ, सिद्धार्थ जाधव यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे.

यंदाच्या महोत्सवातील विशेष आकर्षण ठरणार आहे ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना प्रदान करण्यात येणारा ‘लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत पाच दशकांहून अधिक काळ दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

उदयोन्मुख दिग्दर्शक आणि नव्या पिढीतील कथाकथनाला प्रोत्साहन देण्यासाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमासाठी फिल्म क्रिटिक्स गिल्ड आणि प्रसिद्ध चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांचे सहकार्य लाभले आहे.

याबाबत बोलताना रेड एफएमच्या संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निशा नारायणन म्हणाल्या, ‘’प्रादेशिक कथा अधिक मोठ्या सांस्कृतिक व्यासपीठावर पोहोचायला हव्यात, असा आमचा कायम विश्वास राहिला आहे. मराठी सिनेमातील सर्जनशीलतेचा गौरव करत नव्या कथांना व्यासपीठ मिळवून देण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. एका स्क्रीनपासून सुरू झालेला हा प्रवास आज अनेक स्क्रीन्स आणि विविध फॉरमॅट्सपर्यंत पोहोचला आहे. नव्या पिढीतील दिग्दर्शक आणि कथाकारांना प्रोत्साहन देतानाच प्रादेशिक कथाकथनाची ताकद साजरी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी