-संघर्षावर मात करत पुण्यातील रात्र शाळेचे विद्यार्थी राज्यात अव्वलदि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी संचलित आबासाहेब अत्रे रात्र प्रशालेच्या राज्यात प्रथम आणि द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
पुणे : पहाटेपासून वेदपाठशाळेतील दिनक्रम, पौरोहित्याचे काम आणि रात्री अभ्यास… ; तर दुसरीकडे दिवसा सुरक्षा रक्षक आणि बाउन्सर म्हणून काम, रात्री शाळेत शिक्षण, घर आणि मुलाची जबाबदारी… अशा प्रतिकूल परिस्थितीतही वसुप्रद कुलकर्णी आणि अंकुश रेवाळे यांनी जिद्दीच्या जोरावर दहावीची परीक्षा केवळ उत्तीर्णच केली नाही, तर राज्यात प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवत संघर्षातून यशाची प्रेरणादायी कहाणी साकारली आहे.
दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी संचलित आबासाहेब अत्रे रात्र प्रशाला तर्फे संघर्षातून यश मिळवणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या सोमवार पेठ येथील प्रांगणात करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष संजीव महाजन, सचिव प्रफुल्ल निकम, सदस्य भारत वेदपाठक, समन्वयक कैलास साळुंखे हे उपस्थित होते.
आबासाहेब अत्रे रात्र प्रशाला या रात्र शाळेचा यंदाचा दहावीचा निकाल ८८.८८ टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या वसुप्रद कुलकर्णी यानी ९०.४० टक्के गुण मिळवले आहेत. तर अंकुश रेवाळे यांनी ८४.८० गुण मिळवून राज्यात द्वितीय आले आहेत. दहावी व बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी गौरविण्यात आले.
विवेक वेलणकर म्हणाले, यापुढील काळात श्रमजीवी माणसांचे महत्त्व अधिक वाढणार आहे. भविष्यात स्किल-बेस्ड शिक्षणाकडे सर्वांनाच वळावे लागेल. आयआयटी आणि आयटीआय या दोन्ही शिक्षणप्रवाहांना समान महत्त्व मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने कौशल्याधारित शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे. आपल्या परिसरात अनेक चांगल्या संस्था उपलब्ध आहेत. पारंपरिक शिक्षण जरूर घ्या; पण त्यासोबत स्किल-बेस्ड शिक्षणही आत्मसात करा.
नारायण चांडक म्हणाले, रात्र शाळेतील प्रत्येक विद्यार्थी कर्तबगार आहे. हे यश केवळ गुणांपुरते मर्यादित न ठेवता स्वतःची कौशल्ये विकसित करा. आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नका.
वसुप्रद कुलकर्णी म्हणाले, सातवीपर्यंत नियमित शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर वेद शिकण्यासाठी वेदपाठशाळेत प्रवेश घेतला. पहाटे ४ वाजल्यापासून दिनचर्या सुरू व्हायची. दिवसभर वेदपाठशाळेत अभ्यास, त्यानंतर पौरोहित्याचे काम आणि रात्री शाळेत जाऊन अभ्यास करत दहावी उत्तीर्ण झालो.
अंकुश रेवाळे म्हणाले, दिवसभर सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होतो. वेळ मिळेल तेव्हा बाऊन्सरचेही काम केले. आयुष्यात अनेक चढ-उतार आले. पत्नी कामानिमित्त परदेशात असल्याने मुलाची जबाबदारी माझ्यावरच होती. नाईट ड्युटी करून हे सर्व सांभाळत अभ्यास केला. परीक्षेच्या अवघ्या २० दिवस आधी वडिलांचे निधन झाले. अशा कठीण परिस्थितीत जमेल तसा अभ्यास करून हे यश मिळवले.
सचिव प्रफुल्ल निकम म्हणाले, संस्था यंदा शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे यात हे यश एक महत्वाचे पाऊल ठरत आहे,रात्र प्रशालेसाठी संस्था नेहमीच प्रयोगशील असते यापुढेही नवनवीन उपक्रम करीत राहू.
प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक संजय सातपुते म्हणाले, ही दिवसाची शाळा असती तर कदाचित याचा मोठा गाजावाजा झाला असता. मात्र, रात्र शाळेतील विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असतात. कितीही गुण मिळाले तरी शिक्षण पूर्ण केल्याचे समाधान वेगळेच असते. अनेक चटके सहन करून हे विद्यार्थी शिक्षण पूर्ण करतात, याचा आम्हाला अभिमान आहे.
