दलित आणि सवर्णांना जोडून सामाजिक ऐक्य उभारुया – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून आल्याबद्दल सांगलीत नागरी सत्कार
सांगली दिनांक २८ – “मी सांगलीचा आहे. माझ्या चळवळीची सुरुवातही सांगलीतूनच झाली. या सांगलीने मला नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे. तिसऱ्यांदा मी राज्यसभेवर निवडून आलो आहे. सांगलीचे ऋण फेडण्यासाठी मंत्रिपदाचा लाभ येथे कायम देईन,” दलित मराठा यांना जोडण्यासाठी सामाजिक ऐक्य साधणे हेच आपले उद्दिष्ट्य आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज सांगली येथे दिले.
आठवले तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून आल्याबद्दल येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार दिलीप सोपल, जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजप नेते दीपक शिंदे-म्हैसाळकर, आदर्श सरपंच भीमराव माने, काँग्रेसचे नगरसेवक राजेश नाईक, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, जैन सभेचे माजी अध्यक्ष रावसाहेब पाटील, प्रा. सीमा आठवले आणि कार्यक्रमाचे संयोजक राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक विठ्ठल पाटील, गगनराज पाटील उपस्थित होते. भाषणाच्या सुरुवातीला आठवले यांनी आपल्या शैलीत चारोळ्या सादर करत सांगलीचे कौतुक केले.
“चळवळीत काम करत असताना माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याशी संपर्क आला. त्यांनी मला प्रेरणा दिली. दलित आणि मराठा समाज एकत्र आणण्यासाठी त्यांनी मोठी ताकद दिली. त्यामुळेच मी गावोगावी पोहोचलो आणि आज या पदावर पोहोचलो. या पदाचा लाभ सांगलीकरांना मिळावा, अशी माझी इच्छा आहे. पाटील खासदार विशाल म्हणाले, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून ते राज्यभरच नव्हे, तर देशभर पोहोचवण्याचे काम आठवले यांनी केले आहे. त्यांनी बाबासाहेबांचे विचार समाजात रुजवले. त्यामुळेच ते वंचितांचे मंत्री म्हणून ओळखले जातात.” आमदार इद्रिस नायकवडी म्हणाले, “मी आमदार होऊन दीड वर्ष झाले; तरी काहींना ते अद्यापही पटत नाही. ‘इद्रिस आमदार आहे,’ असे सांगावे लागते. आजही मी माझ्या मित्रांसाठी तसाच आहे.” समित कदम, दीपक शिंदे- म्हैसाळकर, दिलीप सोपल यांनी विठ्ठल पाटील यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. “जे आम्हाला सुचले नाही, ते विठ्ठल पाटील यांना सुचले,” असे ते म्हणाले. विठ्ठल पाटील यांनी प्रास्ताविकात वारकरी परिषदेची माहिती देत आठवले यांच्याशी असलेल्या मैत्रीचा उल्लेख केला. जगन्नाथ ठोकळे यांनी आभार मानले.
हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख
