फायर सेफ्टी व सिक्युरिटी क्षेत्रातून राष्ट्रनिर्मितीला चालना
- माजी राजदूत दीपक वोहरा यांचे मत; फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियातर्फे चर्चासत्र
पुणे: “आपला भारत देश तंत्रज्ञान, उद्योग, सुरक्षा, अवकाश संशोधन स्वतंत्र ओळख निर्माण करीत असून, सक्षम अर्थव्यवस्था म्ह्णून जागतिक स्तरावर स्थान बळकट करीत आहे. भारताची प्रतिमा एक सक्षम, विश्वासार्ह आणि वेगाने प्रगती करणारा देश अशी तयार होत आहे. फायर सेफ्टी आणि सिक्युरिटी क्षेत्रातील कामगिरीही याला अपवाद नाही. त्यातून राष्ट्रनिर्मितीला चालना देण्याचे काम होत आहे,” असे प्रतिपादन भारताचे माजी राजदूत व परराष्ट्र सेवेतील निवृत्त अधिकारी दीपक वोहरा यांनी केले.
फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया (एफएसएआय) पुणे चॅप्टरच्या वतीने ‘सुरक्षित भारत’ या विषयावरील चर्चासत्रात दीपक वोहरा बोलत होते. वाकड येथील हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल येथे आयोजित या चर्चासत्र ‘सुरक्षित भारत’ घडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर, नियमांचे काटेकोर पालन आणि सर्व स्तरांवर जागरूकता वाढवण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. तसेच यावेळी ‘एफएसएआय’च्या डायरीचे प्रकाशन करण्यात आले. वोहरा व पोटफोडे यांच्या हस्ते १२ मान्यवरांचा उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, एक्स बझ फायर अँड सिक्युरिटीचे संचालक चिंटू आशेर, ‘एफएसएआय’ पुणे चॅप्टरचे अध्यक्ष सुजल शहा, सचिव सागर मुनीश्वर, सिम्पल जैन, प्रदेश संचालक वरुण तिवारी, संयोजक केदार देशमुख, शिवम फायरवाला, विनायक जोगळेकर, अजित यादव, अमोल उंबरजे, ऋतुराज कुलकर्णी, सागर कुलकर्णी यांच्यासह उद्योग, बांधकाम आणि सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपक वोहरा यांनी भारत आणि इतर देशांमधील संबंधांवर, भारताच्या क्षमतेवर विचार मांडले. आज भारत स्वयंपूर्णतेकडे जात असून, सुरक्षा क्षेत्रातही मोठी प्रगती करत आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरक्षित भारतासाठी विविध उपाययोजना करण्यावर आपले लोक काम करताहेत, याचे समाधान वाटत असल्याचे वोहरा म्हणाले. फायर सेफ्टी आणि सिक्युरिटी क्षेत्रातील कंपन्या अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांच्या माध्यमातून भारताला आत्मनिर्भर बनवण्यास हातभार लावत आहेत.
देवेंद्र पोटफोडे म्हणाले, “आधुनिक बांधकाम क्षेत्रात आकर्षक रचना, उंच इमारती आणि काचेच्या संरचनांचा वापर वाढत आहे. मात्र, लक्षवेधक बांधकाम करण्याच्या प्रयत्नात सुरक्षेच्या बाबतीत तडजोड होऊ नये. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजनांची तरतूद बांधकाम करताना व्हायला हवी. सेफ्टी सर्टिफिकेशन केवळ औपचारिकता न राहता त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.”
चिंटू आशेर यांनी बदलत्या व्यावसायिक वातावरणातील आव्हानांवर भाष्य केले. बाजारातील अनिश्चितता आणि तांत्रिक बदल लक्षात घेता उद्योजकांनी ‘प्रॉब्लेम सॉल्व्हर’ बनणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अडचणी या संधींमध्ये रूपांतरित करून सातत्याने नवकल्पना स्वीकारणे हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेष चर्चासत्रामध्ये गणेश जाधव, देवेंद्र पोटफोडे, शैलेश धनाने, सुभाष खानडे, नरेंद्र दिवेदी यांनी सहभाग घेतला. सुजल शहा यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सागर मुनीश्वर यांनी आभार मानले.
