August 30, 2026

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे बण्डा जोशी यांचा विशेष सन्मानभारतीय समाजमनावर ‘सेन्स ऑफ ह्युमर’चे संस्कार नाहीत : श्रीनिवास भणगे

0
IMG-20260829-WA0131
Spread the love


बण्डा जोशी यांचे सादरीकरण प्रभावी : श्रीनिवास भणगे
पुणे : भारतीय समाजाला हसविणे सोपे नाही, कारण भारतीयांची मनोवृत्ती सहजप्रवृत्तीपेक्षा निवृत्तीकडे जाणारी आहे. भारतीय समाज पुराणकाळातून आजही बाहेर आलेला दिसत नाही. पुराणात विनोदाला स्थान नाही त्यामुळे भारतीय समाज मनावर ‘सेन्स ऑफ ह्युमर’चे संस्कार झालेले नाहीत. बण्डा जोशी यांचे सादरीकरण अतिशय प्रभावी असून शब्दोच्चार, विचार, अर्थासहित सार्थ शब्दप्रयोग हे त्यांच्या शैलीचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या सादरीकरणात सहजता, उत्तम शब्दफेक प्रकर्षाने जाणवते, असे मत ज्येष्ठ नाट्यचित्रपट लेखक, दिग्दर्शक श्रीनिवास भणगे यांनी व्यक्त केले.
मराठीतील सुप्रसिद्ध एकपात्री विनोदी कलाकार बण्डा जोशी यांच्या रंगमंचीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे त्यांचा शनिवारी श्रीनिवास भणगे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. भारती जोशी यांचा सन्मान मैथिली आडकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात बण्डा जोशी यांचा ‘हास्यपंचमी’ हा विनोदी एकपात्री कार्यक्रम रंगला.
समाजभान न जपता अर्थहीन शब्द उच्चारणारे लोकप्रतिनिधी आपल्या समाजात आहेत हे आपले दुर्दैव आहे, अशी टीका करून श्रीनिवास भणगे पुढे म्हणाले, बण्डा जोशी यांचे माध्यम विनोदी लेखन, सादरीकरण आहे. विनोदी लेखन, सादरीकरण करणे ही सोपी गोष्ट नाही; कारण समाजातील लोकांना रडविणे सोपे आहे पण हसविणे नाही. विनोद म्हणजे निव्वळ पोपटपंची, पांचटपणा, तुच्छ अशी शिकवण आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे समाजाला निखळ विनोदाचा आनंद देणे सोपे नाही.
सत्काराला उत्तर देताना बण्डा जोशी म्हणाले, माझ्या ५० वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीचे श्रेय मी कुटुंब, संस्कार, शिक्षक, प्राध्यापक यांना देतो. माणूस जेव्हा खळखळून हसतो तेव्हा तो सर्वात सुंदर दिसतो आणि असे सुंदर चेहरे बघण्याचे भाग्य माझ्या सारख्या कलावंतांना नेहमीच लाभते याचे समाधान आहे. परमेश्र्वराने आपल्याला शरीर, मन आणि बुद्‌धी या तीनही गोष्टी दिलेल्या आहेत त्यांना आनंद देण्याचे काम विनोद आणि हास्य करत असतात. पुण्यामध्ये माझा पहिला कार्यक्रम प्रमोद आडकर यांनी आयोजित केला होता. त्यामुळे कलाकार म्हणून पुण्यात माझी ओळख निर्माण झाली.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी बण्डा जोशी यांच्या समवेतच्या मैत्रीला उजाळा देत कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. हास्यपंचमीचा पंधराशे, तीन हजार आणि पाच हजारावा प्रयोग रंगत-संगततर्फे आयोजित करण्यात आला याचा आनंद आहे.
आदिती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ : रंगत-संगत प्रतिष्ठान आयोजित सन्मान सोहळ्यात (डावीकडून) आदिती कुलकर्णी, ॲड. प्रमोद आडकर, बण्डा जोशी, श्रीनिवास भणगे, मैथिली आडकर.
प्रति,
मा. संपादक
मराठीतील सुप्रसिद्ध एकपात्री विनोदी कलाकार बण्डा जोशी यांच्या रंगमंचीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे शनिवारी त्यांचा सन्मान करण्यात आला. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
ॲड. प्रमोद आडकर, अध्यक्ष, रंगत-संगत प्रतिष्ठान
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी