-मनुष्यजन्मात पशूसारखे वर्तन केले तर जीवन व्यर्थप.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने श्री गणेश गीतेतील ‘भक्तीयोगा’ वर प्रवचनमालेचा तिसरा दिवस
पुणे : भगवंताने ८४ लक्ष योनींनंतर आपल्याला मनुष्यजन्म दिला आहे. या जन्मात पशूसारखे वर्तन केले, तर भगवंत वरून सर्व पाहत असतो. जगातील कोणत्याही पशूला नसलेली मुक्तीकडे जाण्याची क्षमता आणि मार्ग माणसाला प्राप्त झाला आहे. जर त्याचा उपयोग आपण केला नाही, तर विनाकारण मनुष्यजन्म मिळाला असे समजावे. मृत्यू कधी ना कधी येणारच आहे; त्याला हसत सामोरे गेले पाहिजे. मृत्यूला आनंदाने स्वीकारणे यालाच कर्मयोग म्हणतात आणि ते कसे करावे, याचा मार्ग म्हणजे भक्तीयोग, असे प्रतिपादन प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित प्रवचनमालेत यवतमाळ वणी येथील प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी श्री गणेश गीतेतील भक्तीयोगावर तिसऱ्या दिवशी निरूपण केले. श्रीमंत थोरले बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात ही प्रवचनमाला सुरु आहे. अधिकमासाच्या पावन मुहूर्तावर भगवान श्री गणेशांच्या भक्तीचा मार्ग प्रशस्त करणारा श्री गणेश गीतेतील भक्तीयोग गणेशभक्तांसमोर मांडण्याकरीता प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज म्हणाले, स्त्री ला माता होता येते, हा स्त्रीचा सगळ्यात मोठा गौरव आहे. मातृत्व हा जगातला सगळ्यात मोठा अलंकार तिला दिलेला आहे आणि भगवंताने स्त्रीचा केलेला तो सर्वोच्च गौरव आहे.
ते पुढे म्हणाले, शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान याने जो युक्त आहे तो श्रीमंत आहे. हे नसेल तर बाकीच्या श्रीमंतीचा काहीही उपयोग नाही. हे तत्त्व एखाद्यालाच कळते. मोरया समजून घ्यायचा असेल तर आधी प्रकृती समजून घ्यावी लागेल. प्रकृती समजून घेतली तर तिला जो चालवत आहे तो कळेल. देहात आहे तो वक्रतुंड, देही आहे तो एकदंत आणि दोन्ही बाजूला पडतील तर तिसरा असतो तो महोदर.
दि. २३ मे २०२६ पर्यंत दररोज सायंकाळी ६.३० ते ८ यावेळेत ही प्रवचनमाला होणार आहे. भगवंताच्या भक्तीचे नेमके स्वरूप काय? भगवान कशाला भक्ती म्हणतात? याचे सविस्तर विश्लेषण मांडण्याकरिता आणि अधिकमासाच्या पावन मुहूर्तावर भगवान श्री गणेशांच्या भक्तीचा मार्ग प्रशस्त करणारा श्री गणेश गीतेतील भक्तीयोग गणेशभक्तांसमोर मांडण्याकरीता प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
