प्रती,मा. नवलकिशोर राम,आयुक्त, पुणे मनपा.
विषय – विनावापर पडून असलेल्या ” पिंक बस ” / महिलांसाठी उपयुक्त स्वच्छतागृहांबाबत…. सदर बसेस ना त्वरित ड्रेनेज व पाणी कनेक्शन उपलब्ध करणेबाबत….
मा. महोदय,
जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी बागेच्या दारात ” ती “च्या साठीचे (महिलांसाठीचे स्वच्छतागृह) बघितले आणि मनस्वी आनंद झाला की पुणे मनपा प्रशासन महिलांची काळजी घेते आहे.
मात्र हा आनंद क्षणिक ठरला कारण सदर स्वच्छतागृह बंद असल्याचे आढळून आले. वस्तूत: स्त्रियांना वापरण्याजोगे पुरेसे स्वच्छतागृह नसल्याने महिलांची होतं असलेली कुचंबणा यावर अनेकदा टीका झालीये, आंदोलनं झालीयेत आणि विशेषत: गणेशोत्सव, पालखी, दिवाळी अश्या महत्वाच्या वेळी तर आपल्या महिला पोलिसांसह सामान्य पुणेकर भगिनींचे हाल बघता शहरात पुरेसे महिला स्वच्छतागृह उभारणे गरजेचेच आहे.
त्या पार्श्वभूमी ही बस बघून हायसे वाटले. मात्र ती बंद असल्याचे समजल्यावर खोलात जाऊन माहिती घेतली असता शहरात सध्या अश्या अकरा (11) बसेस साठी निविदा प्रक्रिया राबवून ” pay and use ” ह्या तत्वावर सदर बसेस मे. सारा प्लास्ट प्रा. लि. यांस चालविण्यास देण्यात आल्या असून ही संस्था शहरातील विविध ठिकाणी ह्या बस उभ्या करून पाच रुपये प्रती महिला शुल्क घेऊन त्या महिलांसाठी उपलब्ध करून देणार आहेत.हा करार पाच वर्षांसाठीचा असून त्या पैश्यातून ते सदर स्वच्छतागृहाची देखभाल करणार आहेत.त्यासाठी ह्या अकरा बसेस वापरासाठी तयार करण्यात येणार असून ती संस्था त्यासाठी 90 लाख खर्च करणार आहे.
यातील एक बस शनिवावाडा येथे कार्यरत आहे म्हणजे तिचा वापर होतो आहे. दोन बसेस प्रत्येकी एक छत्रपती संभाजी उद्यान आणि कात्रज उद्यान येथे विनावापर उभ्या असून त्यांना पाणी व ड्रेनेज कनेक्शन उपलब्ध करून न दिल्याने त्या विनावापर उभ्या असल्याची माहिती मिळाली. इतर बसेस अद्याप तयार होतं असून काही कालावधी नंतर त्या वापरात येतील.
तरी आपण तातडीने आदेश देऊन सदर बसेस ना ड्रेनेज, पाणी व इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी आग्रही मागणी करत आहे.
याद्वारे भगिनींची सोय तर होईलच पण एक सुसंस्कृत शहर म्हणून पुण्याची ओळख अधोरेखित होईल.प्रशासन आपल्या नागरिकांच्या प्रती संवेदनशील आहे असा संदेश देखील यातून जाईल.
सदर
आपण त्वरित कार्यवाही कराल अशी अपेक्षा आहे.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष, क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995
