March 10, 2026

गौरी जोशी, डॉ.अमृता चांदोरकर यांना यंदाचे महिला उद्योजिका पुरस्कारयाज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान तर्फे आयोजन ; खासदार प्रा.डॉ.मेधा कुलकर्णी, महापौर मंजुषा नागपुरे यांची उपस्थिती

0
IMG-20260309-WA0018(1)
Spread the love


पुणे : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) तर्फे महिला उद्योजिका पुरस्कार २०२६ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यांतर्गत वितरित होणारा स्वयंसिद्धा पुरस्कार जी.आर.इंजिनिअरींगच्या संचालिका गौरी जोशी यांना आणि युवा उद्योजिका पुरस्कार निरामय वेलनेसच्या संचालिका डॉ.अमृता चांदोरकर यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या माणिक सुपेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला संस्थेच्या प्रतिभा संगमनेरकर, डॉ.स्वाती कुलकर्णी, श्रीकांत जोशी, उपेंद्र केळकर, मंजुषा वैद्य आदी उपस्थित होते.

सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सुमंत मुळगावकर सभागृहात शनिवार, दिनांक १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यसभेच्या खासदार प्रा.डॉ.मेधा कुलकर्णी या असणार आहेत. महापौर मंजुषा नागपुरे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. युवा उपक्रमांतर्गत कै.सौ.सावित्रीबाई नारायण जोशी स्मरणार्थ स्वयंसिद्धा पुरस्कार आणि कै.मनोरमा शामराव कुंभोजकर स्मरणार्थ युवा उद्योजिका पुरस्कार दिला जातो. सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

अपारंपारिक ऊर्जा व भारतातील अनेक ठिकाणी यासंबंधीचे प्रकल्प उभे करणारे जीआर इंजिनियर्स कंपनीच्या संस्थापिका व संचालिका म्हणून गौरी जोशी कार्यरत आहेत. तर, निरामय वेलनेस सेंटरच्या माध्यमातून गेली दोन दशके लाखो रोग्यांना विनास्पर्श अनेक व्याधींपासून मुक्तता देणा-या डॉ.अमृता चांदोरकर यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात येणार आहे. याशिवाय व्यवसायिक व नोकरदार महिलांसाठी ‘व्यावसायिक कार्यामध्ये शिष्टाचार’ या एका महत्त्वाच्या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. जयश्री फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ ही संस्था १९४० साली स्थापन करण्यात आली. युवा हा उपक्रम २००४ साली स्व. चंद्रकांत जोशी यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील अधिवेशनात सुरु करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी