-प्रियदर्शनी विद्या मंदिर यंदाच्या जाधवर आंतरशालेय क्रीडा करंडकाचे मानकरीजाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ; राजाराम राऊत यांना आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान
पुणे : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट तर्फे तिस-या जाधवर आंतरशालेय क्रीडा स्पर्धा आणि ८ व्या जाधवर क्रीडा महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यामध्ये तिस-या जाधवर आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत यंदा सलग तिसऱ्या वर्षी धनकवडी येथील प्रियदर्शनी विद्या मंदिर ने बाजी मारली. तर, ८ व्या जाधवर क्रीडा महोत्सवात प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाने फिरता करंडक पटकाविला आहे.
न-हे येथील जाधवर इन्स्टिटयूटच्या सभागृहात झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी क्रीडा व युवक सेवा लातूर विभागाचे उपसंचालक महादेव कसगावडे, जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते. यावेळी आदर्श क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे महासचिव राजाराम राऊत यांना तर आदर्श खेळाडू पुरस्कार छत्रपती पुरस्कार विजेता तुषार डुबे यांना प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरुप होते.
महादेव कसगावडे म्हणाले, आई-वडिलांनी ‘मुलं खेळतात, त्यातून आता काय होणार?’ असे म्हणून चालणार नाही. क्रीडाक्षेत्रात खूप मोठी करिअर करण्याची संधी आहे. खेळ आता प्रोफेशनल झाले असून ते एक आनंददायी क्षेत्र आहे. यासाठी सातत्यपूर्ण सराव करणे गरजेचे आहे. खेळाला राजाश्रय मिळाला पाहिजे. सध्या खेळ महाग झाला आहे. खेळाचे साहित्यही महाग असल्यामुळे अनेक वेळा आई-वडिलांना खेळाडू पोसणे शक्य होत नाही. मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही चांगला खेळाडू घडू शकतो. चांगली कामगिरी केल्यास खेळाडूंना सरकारकडून दर महिन्याला स्कॉलरशिप दिली जाते.
राजाराम राऊत म्हणाले, खेळ आणि शिक्षणाची योग्य सांगड घातली तर खेळाडू निश्चितच यशस्वी होतो. अतिशय गरीब घरातून आलेली अनेक मुले आज आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. सध्या क्रीडाक्षेत्रात खेळाडूंना आवश्यक त्या सोयी-सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. जाधवर इन्स्टिट्यूटसारख्या संस्था खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहत त्यांना मार्गदर्शन व पाठबळ देत आहेत.
ॲड. शार्दुल जाधवर म्हणाले, बँक, रेल्वे, आरबीआय यांसारख्या संस्थांच्या स्वतंत्र क्रिकेट टीम्स असतात. खेळांमधून नेतृत्वगुण, टीमवर्क आणि एकत्र काम करण्याची क्षमता विकसित होते. संघामध्ये चार-पाच जण एकत्र येऊन जे सामूहिक प्रयत्न करतात, त्यातून मोठ्या प्रमाणात कौशल्ये घडतात. खेळामुळे प्रत्येक गोष्ट समजून घेण्याची क्षमता वाढते आणि पराभव स्वीकारण्याची ताकद मिळते. ही ताकद मोबाईल गेम्स किंवा पब्जी खेळून मिळत नाही. जोपर्यंत खेळाडू प्रत्यक्ष मैदानात उतरून खेळत नाही, तोपर्यंत हार पचवण्याची मानसिकता विकसित होत नाही. मैदानात पराभव झाल्यानंतर जो जिद्द, जोश आणि आत्मपरीक्षण निर्माण होते, ते आयुष्यात खूप महत्त्वाचे ठरते. खेळाच्या माध्यमातून व्यक्तीला स्थिरता, शिस्त आणि आत्मविश्वास मिळतो. त्यामुळे आयुष्यात स्थिर राहायचे असेल, तर खेळासारखा उत्तम पर्याय दुसरा नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
