February 15, 2026

सेवाभावी वृत्तीच्या लोकांमुळेच समाजात संतुलनराज्यमंत्री माधुरी मिसाळ : ज्येष्ठ बांधकाम व्यवसायिक दत्ताजी गायकवाड यांच्यावतीने विद्यार्थिनींना सायकल : शिक्षण प्रसारक मंडळी व निरामय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन

0
IMG-20250712-WA0043
Spread the love


पुणे : सायकलचा वापर केल्यामुळे केवळ पर्यावरणपूरक प्रवास शक्य होतो असे नाही, तर त्यातून नियमित व्यायामाची सवयही लागते, जी शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. समाजासाठी स्वतःचे जीवन समर्पित करणारे दत्ताजी आणि वैदेही गायकवाड दांपत्य आहे. आजच्या कलियुगातील संतुलन हे सेवाभावी वृत्तीच्या चांगल्या लोकांमुळेच टिकून आहे. भारतीय संस्कृती जपण्याचे आणि सेवाभाव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम या व्यक्तींच्या माध्यमातून होत आहे, असे मत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.

शिक्षण प्रसारक मंडळी व निरामय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नू. म. वि. मुलींची प्रशाला व स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानच्या होतकरू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले. स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ बांधकाम व्यवसायिक दत्ताजी गायकवाड यांच्यावतीने विद्यार्थिनींना सायकल देण्यात आल्या.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळ अध्यक्ष ॲड.एस. के. जैन, निरामय संस्थेचे सचिव ज्योतीकुमार कुलकर्णी, शाला समिती अध्यक्ष जयंत किराड, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर काळकर, शि. प्र. मंडळी नियामक मंडळ सदस्य सतीश पवार, मिहीर प्रभुदेसाई , निरामय संस्थेचे विश्वस्त उमेश भोसले इ.मान्यवर यावेळी उपस्थित होते.

माधुरी मिसाळ म्हणाल्या, ‘ग्रीन मोबिलिटी’सारख्या संकल्पना अशा छोट्या कृतीतून प्रत्यक्षात येतात. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच स्वच्छतेची जाण आणि वेळेची शिस्त शिकवली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वैदेही गायकवाड म्हणाल्या, सायकल मिळाल्याने मुलींना आत्मविश्वास आणि योग्य दिशा मिळेल. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत अधिकार आहे. अनेकदा शाळा दूर असल्यामुळे बसची गरज भासते, पण त्याचा खर्च परवडत नाही. वेळ वाया जातो, थकवा येतो. अशा परिस्थितीत सायकल केवळ एक साधन नसून ती शिक्षणाच्या प्रवासासाठी एक गुरुकिल्ली आहे. सायकलमुळे लांबचा प्रवास सुकर होईल आणि मुलींना नियमितपणे शिक्षणासाठी जाता येईल. हे फक्त वस्तू वाटप नाही, तर शिक्षणात सातत्य राखण्यासाठी केलेला प्रयत्न आहे.

ॲड. एस. के. जैन म्हणाले, संस्थेच्या किशोरी शक्ती उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये एक सकारात्मक परिवर्तन होत आहे. केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे हे शिक्षण प्रसारक मंडळीचे उद्दिष्ट नसून, राष्ट्रासाठी जबाबदार आणि सजग नागरिक घडवणे हे खरे ध्येय आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्याचे कार्य शिक्षण प्रसारक मंडळी, निरामय संस्था आणि स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान या तिन्ही संस्था करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरामय संस्थेचे विश्वस्त उमेश भोसले यांनी केले, सूत्रसंचालन दिपाली वाघोलीकर यांनी केले व शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा गुमास्ते यांनी सर्वांचे आभार मानले.

  • फोटो ओळ : शिक्षण प्रसारक मंडळी व निरामय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नू. म. वि. मुलींची प्रशाला व स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानच्या होतकरू विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले. स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवर व विद्यार्थी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी