सशक्त राष्ट्र उभारणीसाठी शिवरायांचे विचार गरजेचे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत संचालक प्रवीण दबडघाव : शिवजयंतीनिमित्त “राजे शिवराय प्रतिष्ठान” तर्फे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे पुरस्कार, ‘ज्ञानेश सेवा समर्पण’ पुरस्कार प्रदान
पुणे: आजच्या काळात मोठ्या प्रमाणावर नकारात्मक घटनांचे प्रमाण वाढत असून त्यामुळे तरुणांच्या मनातही नकारात्मक विचार अधिक दृढ होत आहेत. अशा तरुणांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे त्याग, सेवा आणि समर्पणाचे विचार पोहोचविणे गरजेचे आहे. आज हिंदुस्तानला सशक्त राष्ट्र म्हणून उभे करायचे असेल, तर शिवाजी महाराजांच्या विचारांची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत संचालक प्रवीण दबडघाव यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राजे शिवराय प्रतिष्ठान तर्फे कर्वेनगरमधील राजे शिवराय चौक येथे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याचे उद्घाटन प्रवीण दबडघाव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी दिल्लीतील सनातन महासंघाचे अध्यक्ष डॉ. गौतम खट्टर, नगरसेविका तेजश्री पवळे, राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे, अतुल गोणते, गंगोत्री डेव्हलपर्सचे प्रमुख राजेंद्र आवटे, स्वरूपवर्धिनीचे संजय तांबट, चित्रसेन खिलारे, रवी ननावरे आदी उपस्थित होते.
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये धारातीर्थी पडलेले हुतात्मा जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांना यावेळी सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच स्त्री शिक्षणाच्या कार्यासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांना ज्ञानेश पुरंदरे यांच्या स्मरणार्थ ‘ज्ञानेश सेवा समर्पण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. महापौर मंजुषा नागपुरे यांनी देखील उत्सवाला भेट दिली.
प्रवीण दबडघाव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्मितीसाठी स्वतःचे जीवन समर्पित केले. त्याचप्रमाणे आजच्या तरुणांनी समृद्ध भारत घडविण्यासाठी स्वतःला झोकून देणे गरजेचे आहे. शिवरायांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य राजे शिवराय प्रतिष्ठान करत आहे. अशा प्रकारच्या संस्थांची समाजाला खरी गरज आहे.
गौतम खट्टर म्हणाले, केवळ जयंती साजरी करणे आणि महापुरुषांच्या नावाचा जयघोष करणे म्हणजे राष्ट्रसेवा होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांचे विचार आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारणे आणि त्याप्रमाणे राष्ट्रासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करणे, हेच त्यांना खरे अभिवादन आहे.
महेश पवळे म्हणाले, राजे शिवराय प्रतिष्ठान हिंदुत्वाचा विचार घराघरांत पोहोचविण्यासाठी शिवजयंतीसारखे विविध कार्यक्रम आयोजित करते. यंदा संस्थेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार समाजात पोहोचविण्यासाठी शिवजयंतीच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. संस्थेचे कार्यकर्ते केवळ शिवरायांच्या नावाचा जयघोष करत नाहीत, तर त्यांचे विचार मनात ठेवून त्याप्रमाणे हिंदुत्वासाठी लढण्यास कायम तयार असतात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम चांदेरे यांनी केले. प्रास्ताविक महेश पवळे यांनी केले, तर अक्षय मुळे यांनी आभार मानले.
फोटो ओळ : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राजे शिवराय प्रतिष्ठान तर्फे कर्वेनगरमधील राजे शिवराय चौक येथे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये धारातीर्थी पडलेले हुतात्मा जवान मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांना सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच स्त्री शिक्षणाच्या कार्यासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांना ज्ञानेश पुरंदरे यांच्या स्मरणार्थ ‘ज्ञानेश सेवा समर्पण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
