पडद्यावर बघून अवाक होण्यापासून ते स्वतः पडद्यावर येणे: हितेश भारद्वाजचा ‘आहट’पासून ‘आमी डाकिनी’पर्यंतचा प्रवास

वेधक कथानक आणि अनपेक्षित कलाटण्या यामुळे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘आमी डाकिनी’ मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोलकाताच्या सुंदर पार्श्वभूमीवरील कथानक असलेली ही मालिका या वाहिनीसाठी एक आकर्षक, आगळेवेगळे कथानक घेऊन आली आहे. पूर्वी ‘आहट’ मालिकेत अनुभवलेला थरकाप प्रेक्षक आता पुन्हा या मालिकेतून अनुभवू शकतील. या मालिकेत हितेश भारद्वाज अयानच्या भूमिकेत आहे, तर शीन दास आणि राची शर्मा अनुक्रमे डाकिनी आणि मीरा यांच्या भूमिका करत आहेत.
आपला उत्साह शेअर करताना अभिनेता हितेश भारद्वाज म्हणतो, “आहट मी लहानपणी आवर्जून बघायचो. त्यातील शांतता आणि अचानक येणारा थरार यांचे मला आकर्षण वाटत असे. मला भीती वाटायची पण ती मालिका बघवीशीही वाटायची.” तो पुढे म्हणतो, “माझ्या चुलत भावंडांसोबत ही मालिका बघितल्याचे मला आठवते आहे. आम्ही सगळे जण एका पांघरूणात गुरफटून बसायचो. भीती वाटत नाही असे दाखवायचो, पण प्रत्येक आवाजाला दचकायचो. या आठवणी मनात आजही जिवंत आहेत.”
तो पुढे म्हणतो, “तशाच प्रकारची ऊर्जा असणाऱ्या एका मालिकेत आता मी स्वतः काम करत आहे, ही भावना स्वप्नवत आहे. पलंगावर बसून टीव्हीवर मालिका बघणारा एक लहान मुलगा आता प्रत्यक्ष टीव्हीच्या पडद्यावर आला आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही फक्त एक भूमिका नसून त्याला व्यक्तिगत भावनेचा स्पर्श आहे. मी साकारत असलेला अयान म्हणजे एक गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व आहे. तर्कनिष्ठा आणि अंतःस्फूर्ती, तर्क आणि मान्यता यांच्या कात्रीत तो सापडला आहे. त्याची भूमिका करताना मनातील अव्यक्त, अबोध भीतीचा सामना मी करत आहे. काही भावनिक भीती, आंतरिक लढा यांच्याशी सामना होत आहे. यामुळेच हे पात्र मला खूप जिवंत वाटते.”
बघा, ‘आमी डाकिनी’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर