July 4, 2025

सारसबाग मुस्लिम नागरिकांसाठी ईदच्या दुसऱ्या दिवशी बंद? – रिपब्लिकन युवा मोर्चाचा आरोप, आयुक्तांकडे कायदेशीर कारवाईची मागणी

0
IMG-20250610-WA0106
Spread the love

पुणे : बकरी ईदनंतरच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील सारसबाग सार्वजनिक उद्यान मुस्लिम धर्मीय नागरिकांसाठी मुद्दाम बंद ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन युवा मोर्चाने केला आहे. यासंदर्भात मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देऊन उद्यान विभाग प्रमुख व संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

डंबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक ८ जून २०२५ रोजी, बकरी ईदनंतरच्या दुसऱ्या दिवशी, मुस्लिम समाजातील नागरिक उद्यानात येतील या शक्यतेवरून धार्मिक ध्रुवीकरणाच्या भूमिकेतून सारसबाग उद्यान बंद ठेवण्यात आले. ही कृती भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्ष मूल्यांना सुरुंग लावणारी असून, सार्वजनिक ठिकाणी धार्मिक भेदभाव करून नागरिकांचा प्रवेश रोखण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.

या घटनेमुळे मुस्लिम समाजात नाराजीचं वातावरण निर्माण झालं असून, पुणे महानगरपालिकेच्या या निर्णयाविरोधात विविध संघटनांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. रिपब्लिकन युवा मोर्चाने या प्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

या प्रकरणावर पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, उद्यान सार्वजनिक असल्याने कोणत्याही धर्माच्या नागरिकांना प्रवेश नाकारणे हा घोर अन्याय असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button